पेण तालुक्यातील निगडे ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल
पेण : पेण पंचायत समितीच्या माजी सभापती दर्शना यशवंत म्हात्रे यांनी निगडे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक थेट सरपंच पदासाठी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी दर्शना म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून पेण पंचायत समितीची निवडणूक लढवून त्या विजयी झाल्या होत्या. पेण पंचायत समितीचे सभापती पद देखील त्यांनी भूषवले आहे.
सभापती पदाच्या कार्यकाळात त्यांनी पेण तालुक्यामध्ये अनेक विकासकामे केली. पहिल्यांदाच पंचायत समितीवर निवडून गेल्यानंतर त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. आता शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीकडून दर्शना म्हात्रे यांना निगडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दर्शना म्हात्रे सरपंच पदासाठी तर, जयश्री म्हात्रे, महेश भिकाजी म्हात्रे यांनी सदस्य पदासाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
पेण तालुक्यातील डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका १८ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहेत. राज्यामध्ये बदललेल्या राजकीय समिकरणांनंतर रायगड जिल्ह्यामधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग होत आहे. निगडे ग्रामपंचायतीची निवडणूक देखील महाविकास आघाडी एकत्रित लढत आहे.
दर्शना म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी सरपंच कमलाकर म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते यशवंत म्हात्रे, संजय दगडु म्हात्रे, मोरेश्वर भोईर, महेश भिकाजी म्हात्रे, महेश बाळकृष्ण म्हात्रे, रमेश म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, सुरेश काळू नाईक, प्रनिकेत म्हात्रे, राजु म्हात्रे, जितेश नाईक, जयश्री म्हात्रे, मिनाक्षी नाईक, तृप्ती नाईक, पत्रकार योगेश मुकादम यांच्यासह शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.