अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com: ९८२००९६५७३
नवी दिल्ली : भारतीय संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात श्रीलंकेच्या संघाला ९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि २-१ ने मालिका जिंकली. सूर्यकुमार यादवने केलेले शतक आणि भारतीय गोलंदाजांची शिस्तबद्ध गोलंदाजी यांच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर मालिका विजय मिळवला. आणि भारतात श्रीलंकेविरूद्ध मालिका जिंकण्याची परंपरा कायम ठेवली.
सामन्यात नाणेफेक जिंकताच हार्दिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इशान किशन पहिल्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर राहुल त्रिपाठीने १६ चेंडूत तुफानी ३५ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने दमदार खेळी केली. शुबमन गिलअर्धशतकाच्या जवळ पोहोचला पण ४४ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (४) आणि दीपक हु़ड्डा (४) स्वस्तात बाद झाले. हे दोघे गेल्यावर अक्षर पटेलने सूर्यकुमारला चांगली साथ दिली. सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत ४५ चेंडूत शतक ठोकले. हे सूर्याचे तिसरे आणि भारतीय फलंदाजाकडून यंदाच्या वर्षातील पहिले टी २० शतक ठरले. सू्र्याने ७ चौकार आणि ९ षटकारांच्या साथीने नाबाद ११२ धावा चोपल्या. अक्षर पटेलनेही ९ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद २१ धावा करत संघाला २२८ धावांपर्यंत पोहोचवले.
आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात खराब झाली. त्यानंतर त्यांना सावरताच आले नाही. पाथुम निसांका १५ धावांवर बाद झाला. कुसल मेंडिस देखील २३ धावा काढून माघारी परतला. या दोंघाच्या बाद होण्यानंतर श्रीलंकेच्या डावाल गळतीच लागली. अविष्का फर्नांडो १ धाव काढून बाद झाला. धनंजय डिसिल्वाने २२, चरिथ असालांकाने १९, दसुन शनाकाने २३ धावा करत संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. हसरंगा ९ धावांवर , करूणरत्ने शून्यावर, महेश तिक्षणा २ धावांवर तर मदुशंकाने १ धाव काढून बाद झाला.