अमृत देशपांडे : ९८२००९६५७३ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर हाकेच्या अंतरावरच विविध राज्याची भवन पहावयास मिळतात, पण महाराष्ट्र भवनला लागलेले ग्रहण अद्यापि सुटलेले नाही. बेलापुर मतदारसंघातील भाजपच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजी मार्केटमधील २८५ गाळ्यांच्या अतिरिक्त भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविल्या. जेटीच्या समस्या हाताळत निवारण केले. खाडीपुलामुळे बाधित होणाऱ्या मच्छिमारांना नुकसान भरपाई प्रशासनाकडून मिळवून दिली. मग नवी मुंबईत आजही रिकाम्या अवस्थेत असणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या भुखंडावर महाराष्ट्र भवन दिमाखात उभे राहण्यासाठी आमदार मंदाताई म्हात्रेंची पुढाकार घ्यावा अशी मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे. राज्यात सध्या शिंदे गट व भाजप युतीचे सरकार आहे. सरकारदरबारी विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य मातब्बर मंत्री, भाजपाची नेतेमंडळी यांच्याकडे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शब्दाला विशेष वजन असल्याने महाराष्ट्र भवन कधी उभे राहणार? किती काळ आणखी रेंगाळणार, असा प्रश्न उपस्थित करत आमदार मंदाताईं म्हात्रे यांनी हा प्रश्न लवकरात लवकर धसास लावावा, असा आशावाद नवी मुंबईकरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील मंत्रालयाच्या दारातही रेंगाळली मराठी यावर काव्यसुमनाजंली प्रसिद्ध झालेली असताना नवी मुंबईत सिडकोने दिलेल्या भुखंडावर अन्य राज्यातील भवन दिमाखात उभी असताना महाराष्ट्राच्या भूमीवर महाराष्ट्र भवनाला मंत्रालयीन दरबारच्या उदासिनतेमुळे वर्षानुवर्षे भिजत घोंगडे व्हावे लागल्याचा संताप नवी मुंबईकरांकडून व्यक्त केला जात आहे.
सिडको प्रशासनाने इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारलाही भवनासाठी काही वर्षांपूर्वी भूखंड दिला होता; मात्र सरकारने त्वरीत हालचाली न करता उदासिनता दाखवत भूखंड खरेदी करण्याचा साधा करारही अद्याप केला नसल्याची बाब सर्वसामान्य महाराष्ट्रीयन जनतेमध्ये चीड व संताप निर्माण करणारी आहे. सर्वच विचारधारेची तसेच सर्व राजकीय संघटनांची सरकारे सत्तेवर आली आणि पायउतारही झाली, परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून भविष्यात ओळखले जाणारे महाराष्ट्र भवन उभारण्यास राज्य सरकार मुहूर्ताच्या शोधात असल्याची संतापजनक बाब असल्याचा टाहो फोडण्याची वेळ आज नवी मुंबईकरांवर आलेली आहे.
बेलापुरच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सातत्याने महाराष्ट्र भवन उभाऱण्यासाठी प्रशासन दरबारी गेल्या काही वर्षांत पाठपुरावा केलेला आहे. दिल्लीच्या धर्तीवर नवी मुंबईत मध्यस्थानी भव्य महाराष्ट्र भवन उभारावे, अशी मागणी बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी करताना, केवळ त्यावरच न थांबता प्रशासन दरबारी आजही या विषयावर त्यांचा पाठपुरावा सुरुच आहे. ग्रामीण भागातून महाराष्ट्रात नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी, मुलाखतीसाठी येणाऱ्या मुलांच्या निवासाची व भोजनाची सोय व्हावी, शहरी भागात काही काळ त्यांना हक्काचा आधार मिळावा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना, वरिष्ठ स्तरावरील राजकीय नेतेमंडळींना येथे हक्काने विसावा करता यावा यासाठी महाराष्ट्र भवनाची भूमिका नजीकच्या भविष्यात महत्वाची ठरणार आहे. परंतु महाराष्ट्र भवनचे गेल्या काही वर्षापासून पडलेले भिजत घोंगडे चर्चेशिवाय पुढे सरकलेच नाही.
मागील दीड दशकाच्या कालावधीत वाशी रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात देशातील तब्बल १९ राज्यांनी त्यांची कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या भव्य इमारती उभ्या केल्या आहेत. गुजरात, ओडिशा, नागालँड, मेघालय, उत्तराखंड, मिजोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, केरळ, आसाम, पंजाब, अरुणाचल, गोवा आणि सिक्कीम आदी राज्यांना सिडकोने भूखंडांचे वाटप केले आहे. त्यापैकी काही जागांवर संबंधित राज्यांचे भवन उभे आहेत, काही राज्यांनी भूखंड ताब्यात घेऊन बांधकाम सुरू केले आहे.
आमदार मंदाताई म्हात्रेंचा कामाचा उरक पाहता व प्रशासन दरबारी त्यांचे असलेले वजन आणि भाजपमध्ये असलेला त्यांच्या शब्दाला मान पाहता शिंदे+फडणवीस सरकारच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न लवकर मार्गी लावावा असे नवी मुंबईकरांकडून उघडपणे बोलले जात आहे.