अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील कै. सिताराम मास्तर उद्यानातील वीजेच्या असुविधांचे तातडीने निवारण करण्याची लेखी मागणी अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व सानपाडा नोडमधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा नोडमधील सानपाडा सेक्टर ७ येथील महापालिकेचे कै. सिताराम मास्तर उद्यान हे विस्तिर्ण स्वरुपातील उद्यान आहे. या उद्यान व क्रिडांगणाचा विचार करता महापालिका प्रशासनाने येथे आणखी काही सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. या सुरक्षा रक्षकांना मैदान व क्रिडांगणात सतत फिरण्याचे निर्देश देण्यात यावेत अथवा सर्वांनी मैदान व उद्यानाच्या कानाकोपऱ्यात विखरुन बसण्याचा निर्देशामध्ये समावेश करण्यात यावा. याशिवाय उद्यान व क्रिडांगणाचा आकार पाहता येथे आणखी काही प्रमाणात पथदिवे अथवा छोटेखानी हायमस्ट बसविणे आवश्यक आहे की जेणेकरून येथे कोणतीही छेडछाड, विनयभंग अथवा अन्य दुर्घटना होण्याची शक्यता नाही. उद्यान व क्रिडांगणातील अनेक पथदिवे हे झाडांच्या फांद्यामुळे झाकले जात आहेत. त्यामुळे या पथदिव्यांचा उजेड पडण्यास अडथळे निर्माण होत आहेत. ज्या ठिकाणी पथदिव्यांना झाडांच्या फांद्याचा अडथळा असेल त्या ठिकाणी पथदिव्यांच्या आजूबाजूच्या फांद्याची त्या भागापुरती तातडीने छोटेखानी छाटणी करण्यात यावी, जेणेकरुन उद्यान व क्रिडांगणात माफक प्रमाणात वीजेचा प्रकाश उपलब्ध होईल. तसेच स्थानिक पोलिसांना या उद्यानात सकाळी व सांयकाळी स्थानिक रहीवाशांची गर्दी पाहता त्यांच्या सुरक्षेसाठी पेट्रोलिंग करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात याव्यात. या उद्यानातील वीज विषयक सुविधा माफक प्रमाणावर उपलब्ध करुन देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.