नवी मुंबई : जानेवारी महिन्याची ११ तारीख उजडली तरी केवळ लिपिक नसल्याने महापालिकेच्या रबाले नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक ससेहोलपट थांबविण्यासाठी पालिका प्रशासनाने या आरोग्य केंद्रासाठी लिपिक उपलब्ध करून देण्याची मागणी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त, प्रशासन उपायुक्त व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिकेच्या रबाले नागरी आरोग्य केंद्रात लिपिक नसल्याने आज महिन्याची ११ आली तरी तेथील कर्मचाऱ्यांचे अजूनही वेतन झालेले नाही. महापालिकेच्या सर्वच विभागातील, आस्थापनेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे वेतन झालेले असून केवळ याच ठिकाणी वेतन झालेले नाही. महिनाभर प्रामाणिकपणे काम करायचे व वेतन घेण्याची वेळ आल्यावर लिपिक नसल्याने वेतन रखडायचे, ही बाब योग्य नाही व नवी मुंबई महापालिका प्रशासनाला भूषणावहदेखील नाही. केवळ लिपिक नसल्याने त्यांचे आर्थिक शोषण व ससेहोलपट होत आहे. त्यातच या महिन्यात या आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी निवृत्त झाले. लिपिकाअभावी त्यांचे सर्व्हिस बुक अपडेट नसल्याने त्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा हिशोब मिळण्यास विलंब होत आहे. आयुष्यभर काम करूनही आता सेवानिवृत्तीनंतरच्या लाभासाठी त्यांच्यावर पालिका प्रशासन दरबारी चपला झिजविण्याची वेळ आलेली आहे. कर्मचाऱ्यांचे घराचे व अन्य कर्जाचे हफ्ते वेतनातूनच जात असतात. वेतन वेळेवर न झाल्याने हफ्ते थकण्याची व बॅंक रेकॉर्डही खराब होण्याची भीती आहे. अडीच हजार कोटींच्या एफडी असणाऱ्या व केंद्र आणि राज्य सरकारदरबारी सातत्याने पुरस्कार घेणाऱ्या महापालिकेला ११ तारखेपर्यत केवळ लिपिक नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देता आलेले नाही, ही कर्मचाऱ्यांसाठी शोकांतिका आहे. लिपिक नसल्याने पगार काढणे, प्रशासनात फाईल पाठवणे आदी कामे रखडली आहेत. काम करुनही वेतन देण्यासाठी लिपिक द्या म्हणून पालिका प्रशासनाकडे भीक मागण्याची वेळ आता कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. समस्येचे गांभीर्य पाहता आपण संबंधितांना रबाले नागरी आरोग्य केंद्रात लिपीक तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळमधील महापालिकेच्या मिनाताई ठाकरे माता बाल रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन विलंबाने होत आहे. वेतन विलंबामुळे कामगारांचे आर्थिक शोषण होत असून त्यांची दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आर्थिक ससेहोलपट होत आहे. तरी संबंधित ठेकेदाराला माता बाल रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्याचे निर्देश द्यावेत. तसेच नेरूळच्या माता बाल रुग्णालयात सध्या नवीन ठेकेदार काम करवून घेत आहेत. महापालिकेत काम करणारे सफाई कर्मचारी व अन्य कंत्राटी कर्मचारी हे महापालिका प्रशासनाचे कर्मचारी आहेत. ठेकदार केवळ कामाचे संचलन व नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करवून घेत असतो. ठेकेदार आल्यावर त्याची माणसे भरण्यासाठी जुन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकतो. नवी मुंबई पालिका प्रशासनात असे वारंवार घडत आहे. त्यामुळे या रुग्णालयातील नवीन ठेकेदाराला जुन्या सफाई कर्मचाऱ्यांना तसेच अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरुन न काढण्याचे निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.