अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmai.com : ९८२००९६५७३
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड गुरुवारी (दि. १२ जानेवारी) होणार होती. परंतु, शासनाने ही निवडणूक रद्द केली आहे. बाजार समिती सचिवांनी सर्व संचालकांना पत्र देऊन याविषयी कळविले आहे. यामुळे आता शासन सभापती, उपसभापतींची निवड करणार की प्रशासकाची नियुक्ती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या नवी मुंबईस्थित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सभापती अशोक डक व उपसभापती धनंजय वाडकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन सभापती व उपसभापतींची निवड करण्यासाठी गुरुवारी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. परंतु, नऊ संचालकांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही. यामुळे शासनाने सभापती पदाची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समिती सचिव राजेश भुसारी यांनी याविषयी पत्र बुधवारी सर्व संचालकांना पाठविले आहे.
शासनाचा पुढील निर्णय येईपर्यंत पदाधिकारी निवड रद्द केल्याचे या पत्राद्वारे कळविले आहे. यामुळे संचालकांना धक्का बसला आहे. शासनाने नऊ जणांना अपात्र ठरविले तर संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त होऊन प्रशासकाची नियुक्ती केली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काय निर्णय होतो याकडे आता व्यापारी, प्रतिनिधींचे लक्ष लागलेले आहे.