Navimumbailive.com@gmail.com :९८२००९६५७३
ठाणे : मागील सहा महिन्यांत राज्यात नवे वाद-विवाद निर्माण झाले, गद्दारीची भावना निर्माण झाली, राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले. हे सर्व राज्यात घडत असताना शिवसेनेत नवे चेहरे निर्माण होत आहेत. निष्ठावंत शिवसैनिक पुढे येत आहेत. सुकलेली पाने गळून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील अल्पआयुचे आणि खोके सरकार दोन ते तीन महिन्यात कोसळणारच अशी टिका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. ४० जणांनी व्ही.आर.एस. घेतला असून त्यांचे चेहरे पुन्हा महाराष्ट्रात दिसणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
ठाण्यातील घोडबंदर भागात शनिवारी ठाकरे गटाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. राजकीय कार्यक्रम, मेळावे होत असतात. ज्या व्यक्तिला आम्ही पुढे आणले. त्या एका गद्दाराने राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळविले, याची लाज वाटते. असे आदित्य म्हणाले. मागील सहा महिन्यांत जिथे कुठे कार्यक्रम असतात. तिथे एकच कॅसेट त्यांच्याकडून वाजत असते, असाही आरोप त्यांनी केला.
सत्ताधाऱ्यांचा राजकीय वर्ग हा तुम्हाला धर्मा-धर्मात, जाती-जातींमध्ये भांडवित आहेत. मागील सहा महिन्यांत मोघलशाही सुरु असल्याचे चित्र आहे. निवडणूका जाहीर केल्या जात नाहीत. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, असेही आदित्य म्हणाले. ज्या चाळीस गद्दारांना आयुष्यात सामाजिक आणि राजकीय ओळख दिली. निवडून आणले, मोठी मंत्रीपदे दिली. पण ज्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यावेळी हे एका टेबलवर चढून नाचत होते, अशी घाणेरडी लोक आज सत्तेवर बसले आहेत. अशी टिकाही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर केली.