नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा येथील महापालिकेच्या राजमाता जिजाऊ उद्यानात सुरु असलेल्या कामांविषयी स्थानिक जनतेला माहिती व्हावी यासाठी काम करत असलेल्या ठेकेदाराला तातडीने उद्यानात कामाबाबतचा माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्याची लेखी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नेरुळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे एका निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाचे कोणतेही काम घेतल्यावर त्या ठिकाणी कामाबाबतचा माहिती फलक लावणे संबंधित ठेकेदाराला बंधनकारक असते. स्थानिक रहीवाशांना कामाची माहिती, कामाचे स्वरुप, रक्कम व कालावधी याबाबतचा सविस्तर उल्लेख त्या माहिती फलकावर लावणे आवश्यक असते. नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेचे सिडको वसाहतीमध्ये राजमाता जिजाऊ उद्यान आहे. या उद्यानात गेल्या काही दिवसांपासून काम सुरु आहे. या उद्यानातील खेळण्यांची गेल्या काही वर्षांपासून बोंबाबोंब आहे. झोपाळे तुटलेले असतात. बदक या खेळण्याचा कधी उपयोग झालाच नाही. बदक खेळणे कायमच तुटलेले असते. आता तर ते खेळणे गायबच झाले आहे. या उद्यानात मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांचा कधीही उपयोग होत नाही. आता सुरु असलेल्या उद्यानातील कामाबाबत संबंधित ठेकेदारांने उद्यानात तसेच उद्यानाच्या बाजूला कोणताही माहिती फलक लावलेला नाही. कामाचे स्वरूप काय आहे, उद्यानात नेमके काय काम होत आहे, काय सुधारणा आहेत. किती रक्कम खर्च होणार आहे. कामाचा कालावधी किती असणार आहे याबाबत स्थानिक जनता पूर्णपणे अंधारात आहे. त्यामुळे स्थानिक जनतेला कामाबाबत माहिती व्हावी यासाठी संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर या कामाविषयीचा माहिती फलक लावण्याचे निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.