संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : शहर स्वच्छतेमध्ये देशात तृतीय व राज्यात प्रथम क्रमांकाचे उल्लेखनीय शहर म्हणून नावाजल्या जात असलेल्या नवी मुंबईतील लक्षवेधी शहर सुशोभिकरण हा देखील नवी मुंबईकर नागरिकांच्या व नवी मुंबईला भेटी देणाऱ्या पर्यटकांच्या तसेच नवी मुंबईतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कौतुकाचा विषय आहे. नवी मुंबई शहरात प्रवेश केल्यानंतर डोळ्यांना सुखावणाऱ्या रंगसंगतीने सजलेल्या चित्राकृती, विविधांगी शिल्पे, सुशोभित वाहतुक बेटे यामुळे मनाला आल्हाददायक, सुखावह वाटते अशी भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही विविध पातळ्यांवरून व्यक्त करीत असतात.
यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ला सामोरे जात असताना निश्चय केला – नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणाच्या अधिक वेगळ्या संकल्पना राबविण्यावर भर दिला जात असल्याचे नवी मुंबईतील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कामांमधून दिसून येत आहे.
मागील वर्षी साकारलेल्या भित्तीचित्रांची मधील पावसाळ्यासह इतर ऋतुंमुळे झालेली स्थिती लक्षात घेऊन त्यानुसार त्याची आवश्यक डागडुजी करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आलेले आहेत. यामध्ये ज्या चित्रभिंती चांगल्या स्थितीत आहेत त्या धुवून स्वच्छ करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी रंग धुसर वा पुसट झालेले आहेत त्याठिकाणी रंगाचे आणखी एक लेपन करण्याच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय जी चित्रे पाण्यामुळे शेवाळ साचून खराब झालेली आहेत त्याठिकाणी नवीन रंगसंगतीसह नाविन्यपूर्ण चित्रे रेखाटली जात आहेत.
ही नवीन चित्रे काढताना त्यामध्ये कला, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता अशा विविध बाबींविषयी कोणताही संदेश न लिहिता चित्रांच्या माध्यमातून जनजागृतीपर संदेश प्रसारण होईल अशाप्रकारे कल्पक संकल्पना चितारल्या जात आहेत. यावर्षी काही चित्रभिंती विविध संतांच्या समाजजागृती करणाऱ्या ओव्या, अभंग व वचनांनी सजणार असून त्यासोबतच नामवंत साहित्यिकांच्या जीवनाला प्रेरणा देणाऱ्या काव्यपंक्तीही काही ठिकाणी अनुरुप चित्रांसह सुलेखनांकित करण्यात येणार आहेत.
यंदा नवीन शिल्पाकृती न बसविता मागील वर्षी बसविलेल्या शिल्पाकृतींची आवश्यकतेनुसार डागडुजी केली जात असून त्या सभोवतालचा परिसर सुशोभित केला जात आहे. अशाचप्रकारे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी बसविण्यात आलेली कारंजी कार्यान्वित करण्यात येत आहेत. या कारंजांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता अत्याधुनिक सी – टेक मलप्रक्रिया केंद्रातील प्रक्रियाकृत शुध्द पाण्याचा वापर केला जात असून याव्दारे पिण्याच्या पाण्याची बचत केली जात आहे व नागरिकांमध्ये जलबचतीचा संदेश प्रसारित केला जात आहे. यासोबतच तलावांच्या जलाशयांचे कठडे व सभोवतालच्या जागेच्या सुशोभिकरणावर भर दिला जात आहे.
यावर्षीच्या रंगसंगतीमध्ये कल्पक बदल करण्यास सुरुवात झाली असून सुशोभिकरण कामांचा प्रभाव प्रथमदर्शनी नजरेत भरेल अशा दृश्य स्वरुपात चित्रांकन साकारला गेले पाहिजे या आयुक्तांच्या निर्देशानुसार व्यापक प्रमाणात सुशोभिकरण कामाला सुरुवात झालेली आहे.
या वर्षीही जेजे स्कुल ऑफ आर्ट्स, रचना संसद कला महाविद्यालय, रहेजा स्कुल ऑफ आर्टस अशा नामांकित कला महाविद्यालयांचे विद्यार्थी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन नवी मुंबईचे चित्र बदलण्यासाठी ब्रश हातात घेऊन कामाला लागले असून त्यांच्यासोबत नवी मुंबईतील उत्तम व्यावसायिक चित्रकारही आपले कलात्मक रंग भरत आहेत. साधारणत: ६५० हून अधिक विद्यार्थी व कलावंत चित्रकार नवी मुंबईत ठिकठिकाणी आपले चित्रकलाप्रदर्शन घड़वित असून त्यामध्ये १५० हून अधिक विद्यार्थिनी, महिला चित्रकारांचा समावेश आहे.
या वर्षीचे वेगळेपण म्हणजे मुख्य रस्त्यांप्रमाणेच बॅकलेनच्या स्वच्छता आणि सुशोभिकरणावर विशेष भर दिला जात असून काहीशा दुर्लक्षित असणाऱ्या या बँकलेन विविधरंगी सजू लागल्याने नागरिकांकडून या वेगळ्या कामाची प्रशंसा केली जात आहे. अशाच प्रकारे एमआयडीसी क्षेत्रातील स्वच्छतेकडे अधिक बारकाईने लक्ष दिले जात असून याठिकाणी भित्तीचित्रांव्दारे तसेच परिसर सुशोभिकरणाव्दारे त्या क्षेत्राला दर्शनी आकर्षक बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सोबतच झोपडपट्टी व गांवठाण भागातही सुशोभिकरण करून तेथील चित्र बदलले जात आहे.
स्वच्छ व सुंदर नवी मुंबई ही नवी मुंबईची ओळख नव्या स्वरुपातील आकर्षक भित्तीचित्रांव्दारे तसेच सुशोभिकरणाव्दारे नाविन्यपूर्ण संकल्पना राबवून अधिक लक्षवेधी केली जात असून नागरिकांकडून व प्रवाशांकडूनही नवी मुंबईच्या या नव्या रुपाची प्रशंसा केली जात आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या शहराच्या उद्दिष्टपूर्तीसाठीही शहर सुशोभिकरण हा एक महत्वाचा घटक ठरणार आहे.