नवी मुंबई : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ या मोहीमेतंर्गत नवी मुंबई महापालिका मुख्यालयात पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांनी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. कर्मचारी व अधिकाऱ्यांनी यावेळी जुन्या पेन्शनसाठी आग्रही मागणी करताना समर्थनार्थ बराच वेळ घोषणाबाजीही केली.
यावेळी महापालिका कर्मचारी व अधिकारी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचारी व अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन लागू झालीच पाहिजे यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत सकाळपासून पालिका मुख्यालयात उपस्थित राहून आंदोलनात आक्रमक भूमिका मांडत होते. यावेळी पालिका मुख्यालयात आयुक्त उपस्थित नसल्याने जुन्या पेन्शनसाठीचे निवेदन कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त उज्ज्वला ढोले यांना दिले. जुन्या पेन्शनासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनात इंटक त्यांच्या पाठीशी असून जुनी पेन्शन योजनेसाठी कर्मचारी व अधिकारी करत असलेली मागणी रास्त आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना न्याय मिळेपर्यत इंटक त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याची ग्वाही यावेळी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी यावेळी दिली.