गिरीश नार्वेकर : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्षसंघटनात्मक बदल करण्याचे सुतोवाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्याने नवी मुंबई राष्ट्रवादी कॉग्रेसमधील नामदेव भगत यांच्या विरोधकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. भगत पदावरून जाणार या चर्चा नामदेव भगत यांच्या विरोधकांमध्ये झडत असल्या तरी सहा महिन्यावर आलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सहावी सार्वत्रिक निवडणूक व संघटना बांधणीसाठी नामदेव भगतांना मिळालेला कमी कालावधी आणि नामदेव भगतांचा पर्याय शोधावयाचा झाल्यास तुलनेने सक्षम नेतृत्वाचा व कर्तृत्वाचा अभाव या त्रिसूत्रीच्या आधारावर नामदेव भगत यांना नवी मुंबई पालिका निवडणूक होईपर्यत बदलले जाणार नसल्याची माहिती प्रदेश सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी बेलापुर विधानसभा मतदारसंघामध्ये मविआकडून प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या नामदेव भगत यांना पालिका निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाचा जोरदार गजर करण्याचे अग्निदिव्य पेलावे लागणार आहे.
नामदेव भगत हे नवी मुंबईच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ कार्यरत आहेत. कॉंग्रेसमध्ये २७-२८ वर्षे कार्यरत असताना युवक पदाधिकारी ते महाराष्ट्र सरचिटणिस पदापर्यत त्यांनी घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी नसतानाही स्वबळावर मजल मारली आहे. पालिकेतील नगरसेवक ते विरोधी पक्षनेता, सिडको संचालक अशी वाटचाल त्यांची राहिलेली आहे. शैक्षणिक व धार्मिक कार्यातही त्यांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे. नेरूळ पामबीच मार्गालगत सिडकोने उभारलेल्या आगरी-कोळी भवनाच्या निर्मितीमध्ये नामदेव भगत यांचे योगदान कोणीही नाकारणार नाही. गटबाजीला कंटाळून कामाला वाव मिळत नसल्याने नामदेव भगत यांनी कॉंग्रेस व शिवसेना सोडल्याचे नामदेव भगत यांच्या निकटवर्तीय राजकीय समर्थकांकडून आजही सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये सातत्याने फूट पडत असल्याने राष्ट्रवादीचे खिंडार बुजवून जनसामान्यांमध्ये राष्ट्रवादी लोकाभिमुख करण्याची कामगिरी नामदेव भगत यांना पालिका निवडणूकीपूर्वी करावी लागणार आहे.
शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे व बेलापुर विधानसभा निवडणूक लढविणारे अशोक गावडे ज्या कारणास्तव एकनाथ शिंदे गटात विलीन झाले, त्याच कारणास्तव घणसोली कॉलनीतील सातारचा एक मातब्बर गट कोणत्याही क्षणी एकनाथ शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत दिघा ते बेलापुरदरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटनाबांधणी करण्याची व पक्षसंघटना लोकाभिमुख करण्याची जबाबदारी नामदेव भगत यांना पेलावी लागणार आहे. भगत यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी एक गट सातत्याने मुंबईदरबारी पाठपुरावा करत असला तरी त्यांना मर्यादा आहेत. भगत यांची राजकीय कारकिर्द व बारामतीमधील एका घटकांशी असलेली सलगी पाहता पालिका निवडणूका होईपर्यत भगत यांचे पद कायम राहणार असल्याचे संकेत सूत्रांकडून देण्यात येत आहे.
जिल्हा कार्यकारिणी, तालुका कार्यकारिणी ते थेट प्रभाग सुसंवाद अशी नामदेव भगत यांची राष्ट्रवादीमधील वाटचाल सुरू आहे. रायगडात राहून नवी मुंबईतील राष्ट्रवादी आपल्या मालकीची समजणाऱ्या काहींना प्रदेश नेतृत्वाने तुर्तास नवी मुंबईच्या कारभारातून मुक्त केल्याने नामदेव भगत यांच्या वाटचालीतील अडथळे काही प्रमाणात दूर झाले असल्याचे नवी मुंबईतील राष्ट्रवादीत उघडपणे बोलले जात आहे. रायगडातील नेतृत्वाने अशोक गावडेंना कशा प्रकारे त्रास दिला, काम करताना कसे अडथळे आणले याची आजही नवी मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घटक उघडपणे चर्चा करत आहेत. नवी मुंबईतील भाजपात गटबाजी आहे. बेलापुर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेवकांना, पक्षीय पदाधिकाऱ्यांना ऐरोली मतदारसंघातील ‘पांढऱ्या’ घराचा लळा असल्याने त्या सर्वांवर नजर ठेवण्याची कामगिरी ‘गौरव’चे हितचिंतक इमानेइतबारे बजावत आहे. ऐरोलीच्या तुलनेत बेलापुर भाजपची गुप्तचर यंत्रणा अनेक पाऊले पुढे असल्याने ऐरोलीतील सर्वच घडामोडी बेलापुर भाजपच्या दरबारात इमानेइतबारे कथन केल्या जात आहेत. भाजपातील गटबाजीचा मविआ कितपत फायदा उचलणार यावरही नामदेव भगत यांच्या विधानसभा निवडणूकीतील समीकरणे अवलंबून असणार आहेत.