नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ मधील महापालिकेच्या क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरुस्ती करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा, नवी मुंबईचे जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ९ मधील भुखंड क्रं ३ येथे महापालिकेचे क्रिडांगण असून त्या क्रिडांगणाला महापालिका प्रशासनाकडून झाशीची राणी खेळाचे मैदान असे नाव देण्यात आलेले आहे. क्रिडांगणात प्रवेश करतानाच प्रवेशद्वारावरच महापालिका प्रशासनाकडून क्रिडांगणाचा नामफलकही बसविण्यात आला आहे. परंतु या नामफलकातील राणी हा शब्द निखळून पडला असल्याने नामफलकावर केवळ झाशीची खेळाचे मैदान असा उल्लेख आहे. १८५७चा स्वातंत्र्यसंग्राम गाजविणाऱ्या झाशीच्या राणीचे नाव या क्रिडांगणाला देण्यात आले असल्याने त्या नामफलकाची काळजी घेणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. ‘क्या खूब लढी मर्दानी , वो तो झॉसीवाली राणी थी’ या नुसत्या जयघोषानेही अंगावर आजही शहारे उमटतात. राणी हा शब्द गळून पडल्याने सानपाडावासियांनी मोठ्या प्रमाणावर आमच्या कार्यालयात येवून नाराजी व्यक्त केली आहे. झाशीची राणी या नावाशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या असल्याने तात्काळ त्या नामफलकाची दुरुस्ती करुन त्या ठिकाणी राणी हा शब्द बसविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे पांडुरंग आमले यांनी केली आहे.
यापूर्वीही याच समस्येवर पांडुरंग आमले यांनी २० मार्च २०२३ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर केले होते. त्यांनीही नामफलकाची दुरुस्ती करण्यासाठी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन फॉरवर्ड केले होते. तथापि महिना झाला तरी नामफलक तसाच असल्याचा संताप व्यक्त करताना पांडुरंग आमले यांनी आम्हाला तशी परवानगी द्या, आम्ही आमच्या खर्चांने चांगल्या स्वरूपातील नामफलक त्या क्रिडांगणावर बसवू असे म्हटले आहे.