श्रीकांत पिंगळे : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानात पथदिव्याभोवताली असणाऱ्या झाडांच्या फांद्याची छाटणी करण्याची लेखी मागणी भारतीय जनता मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा सेक्टर ७ मध्ये महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. हे उद्यान विस्तिर्ण असून उद्यानात झाडे असंख्य असल्याने बाराही महिने २४ तास थंडावा असतो. सतत हिरवळ नजरेस पडत असल्याने उद्यानात येणाऱ्यांना विसावा घेताना प्रसन्नता वाटते. या उद्यानात सांयकाळनंतर उजेड पडावा व उद्यानात येणाऱ्या रहीवाशांना अंधाराचा सामना करावा लागू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पथदिवे बसविले आहेत. परंतु या पथदिव्यासभोवताली झाडांच्या फांद्या येत असल्याने उद्यानात उजेडाला अडथळे निर्माण होत आहेत. पथदिव्याभोवताली झाडांच्या फांद्यामुळे उजेडाला मर्यादा पडत असल्याने पथदिवे असूनही ठिकठिकाणी अंधार पडत आहे. या पथदिव्याभोवती असणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आवश्यक आहे.पथदिव्याभोवतालच्या झाडांच्या फांद्याची छाटणी केल्यास पथदिव्यांच्या उजेडाला अडथळे निर्माण होणार नाहीत व उद्यानात अंधार तसेच अंधुक प्रकाश ही समस्याही निर्माण होणार नाही. आपण संबंधितांना तातडीने या उद्यानात पथदिव्याभोवतालच्या झाडांच्या फांद्याची छाटणी करण्याचे निर्देश देऊन या समस्येचे निवारण करावे अशी मागणी पांडुरंग आमले यांनी केली आहे.