नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील उद्यानात सुरू असलेल्या कामाविषयी जनताच अंधारात असल्याने स्थानिक जनतेला माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी समाजसेवक संदीप खांडगेपाटील यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे क्रिडांगण व उद्यान आहे. या उद्यानात गेल्या काही महिन्यापासून प्रशासकीय राजवटीत काम सुरू झालेले आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदारांने कामाविषयी कोणताही फलक उद्यानात लावलेला नसल्याने स्थानिक रहीवाशांना कामाविषयी काडीमात्र माहिती नाही. कोणतेही काम सुरू करताना काम पूर्ण होईपर्यत कामाचे स्वरूप, लागणारा निधी, ठेकेदाराचे नाव, कामाचा कालावधी (सुरु कधी होणार आणि संपणार कधी) याबाबत तपशीलवार माहिती असलेला फलक लावणे बंधनकारक असते. परंतु कदाचित ठेकेदाराचा स्थानिक भागात कोणीतरी राजकीय गॉडफादर असल्याने अथवा महापालिका प्रशासनातील मातब्बर अधिकाऱ्याचा हात डोक्यावर असेल; त्यामुळेच ठेकेदाराने माहिती फलक न लावण्याचे धाडस दाखविले असणार असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानातील कामाविषयी स्थानिक जनतेत संभ्रम निर्माण झालेला आहे. कामाविषयी ठेकेदाराला सर्वप्रथम फलक लावण्याचे निर्देश द्यावेत. तसेच ठेक्यात नमूद केल्याप्रमाणे काम झाले आहे अथवा नाही तसेच कामाचा दर्जा याचीही पाहणी प्रशासनाने करावी. उद्यानातील कामासंदर्भात स्थानिक जनतेत उलटसूलट चर्चा सुरू असल्याने पालिका प्रशासनाने त्या ठेकेदाराला तात्काळ कामाबाबतचा माहितीफलक लावण्याचे निर्देश द्यावेत. कारण यापूर्वी आमच्या विभागात पालिकेची काही कामे केवळ कागदोपत्रीच केलेली आहेत. काही कामे मुदत संपल्यावरही करण्यात आली आहे. याबाबत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकणे आवश्यक असताना त्याची बिले मंजुर करण्यात आली आहे. काही ठेकेदाराने निविदेत ५००चा माल कागदावर असताना ३००च्या साईजचा माल वापरला आहे. सगळा सावळागोंधळ आहे. याप्रकरणी आमचा गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा सुरूच आहे. आज ना उद्या त्याही पाठपुराव्याला यश येणारच असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
उद्यानात सुरू असलेल्या कामाबाबत माहितीफलक लवकरात लवकर लावून जनतेला कामाविषयी माहिती द्यावी आणि काम संपले असेल तर प्रशासनाच्याच हातून या कामाचे लोकार्पण व्हावे. त्याबाबत आपण संबंधिताना निर्देश द्यावेत. स्थानिक जनता या कामाविषयी माहिती जाणून घेण्यास उत्सूक आहे, हे पुन्हा एकवार आपल्या निदर्शनास आणून देत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.