नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच शिरवणे गावातील पथदिव्यांची तपासणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
पावसाळा आता जेमतेम महिन्यावर आलेला आहे. नेरूळ सेक्टर २ आणि ४, जुईनगर नोड तसेच शिरवणे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील, उद्यानातील , क्रिडांगणातील पथदिव्यांची तपासणी करणे आवस्यक आहे. ज्या ठिकाणी पथदिपातील दिवे बंद पडले आहेत अथवा अंधूक प्रकाश देत आहेत, त्या पथदिव्यातील दिव्यांची तात्काळ बदली करण्यात यावी. पथदिव्याच्या केबल्सची तपासणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यास सदोष विद्युत केबल्स पसरून जिवितहानी होण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळीपूर्व कामांमध्ये आपण गटारांची सफाई करतो, वृक्षछाटणी करतो, त्याचधर्तीवर पथदिव्यांची तपासणी करण्याचे, विद्युत दिवे बदलण्याचे, केबल्सची डागडूजी करण्याचे संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.