नवी मुंबई : राज्यात व केंद्र पातळीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनाला सातत्याने पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. मोरबेसारखे स्वमालकीचे धरण असताना पाणीटंचाईचा नजीकच्या काळात नवी मुंबईकरांना सामना करावा लागणार नाही. परंतु नवी मुंबई शहरामध्ये नागरीकरणाच्या बाबतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेरुळ नोडच्या बकालपणाला महापालिका प्रशासनाचे नेरूळ विभाग कार्यालयच जबाबदार असल्याचा आरोप संतप्त नेरूळवासियांकडून उघडपणे करण्यात येत आहे. विशेष नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयाच्या अकार्यक्षमतेकडे दुर्लक्ष करून महापालिका प्रशासन नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयाच्या अकार्यक्षमतेला खतपाणी घालत असल्याचा आरोप नेरूळवासियांकडून उघडपणे केला जात आहे.
नेरूळ विभाग कार्यालय कार्यक्षेत्रातील गावठाण परिसरात दिवसाउजेडी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. अवघ्या काही महिन्याच्या कालावधीत पाच मजली इमारती उभ्या राहत आहेत. आजही गावठाणात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतींचे काम सुरू असताना महापालिकेचे नेरूळ विभाग कार्यालय केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. या बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्यावर टाकून रस्त्यावर ये-जा करण्यास अन्य वाहनांना बांधकाम पूर्ण होईपर्यत कायमस्वरूपी अडथळे आणले जात आहे. वाहनांना तसेच स्थानिक रहीवाशांना त्या ठिकाणाहून ये-जा करणे शक्य होत नाही.
नेरुळ नोडमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा भस्मासूर वाढत चालला आहे. अतिक्रमण विभाग कसला पगार घेत आहे असा प्रश्न नेरूळवासियांकडून विचारला जात आहे. महापालिकेची उद्याने, समाजमंदीरे, मच्छिमार्केट, उड्डाणपुलाखालील व सभोवतालचा परिसर, रेल्वे स्टेशनचा दोन्ही बाजूचा परिसर, सारसोळे बसडेपो, साईबाबा हॉटेल चौक, सीव्हयू उद्यानालगतचा परिसर, सेक्टर १६-१८चा चौक आदी ठिकाणचे रस्ते, पदपथ फेरीवाल्यांनी व्यापलेले असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात नाही. काही राजकीय घटक फेरीवाल्यांकडून हफ्ते घेत आहे, सामाजिक कार्यकर्तेही फेरीवाल्यांना बसवून त्यांच्याकडून मलीदा उकळत आहेत.
अनेक विकासकामे सुरू असताना ठेकेदारांकडून विकासकामांविषयी माहिती फलक लावले जात नसल्याने स्थानिक रहीवाशांना कामाबाबत कोणतीही माहिती नसते. काम काय आहे. कधी सुरू होणार, कधी संपणार, कोण काम करतेय, नेमके कामात कायकाय केले जाणार आहे याबाबत स्थानिक जनता अंधारात असते. नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमधील पालिका उद्यानात गेल्या काही महिन्यापासून काम सुरू आहे. ग्रीन नेट मारून ठेवले आहे. कामाबाबत कोणालाही काहीही माहिती नाही. पालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार करूनही ठेकेदाराचीच पाठराखण करण्यात येत आहे. स्थानिक जनतेला गेल्या काही महिन्यापासून उद्यानाचा वापर करता येत नाही.
प्रभागाप्रभागातील अंर्तगत व बाह्य रस्त्यावर तसेच चौकाचौकात, पथदिव्यांवर, बसथांब्यांवर अनधिकृत फलक लावण्यात येतात. यामुळे महापालिका प्रशासनाचा महसूल बुडतो. परिसराला बकालपणा येतो. या फलकांवर महापालिकेकडून कारवाई होत नाही व अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर पालिका प्रशासनाकडून आजतागायत फौजदारी कारवाई केली जात नाही. राजकीय व मातब्बर सामाजिक घटकांच्या दावणीला बांधल्याप्रमाणे नेरूळ विभाग कार्यालयाचा कारभार सुरू असल्याने नेरूळ नोडमध्ये समस्यांचा बकालपणा वाढत चालला आहे. महापालिका विबाग कार्यालयाच्या उदासिनतेने अनधिकृत बॅनर, अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकाम फोफावले आहे, दिवसा तर दिवसा पण रात्रीही अंडा-भुर्जी, ज्युस, आईसस्क्रिम, पावभाजीच्या गाड्या पालिका विभाग कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर पहावयास मिळतात. अंडा भुर्जी, पावभाजीच्या गाडीवर रात्री शिवीगाळ, धक्काबुक्की होत आहे. भविष्यात रात्रीच्या वेळी आईसस्क्रीम, भुर्जी, अंडापाव, पावभाजीच्या गाड्यांवर हाणामारी, खून झाल्यावर महापालिका प्रशासन रात्रीच्या फेरीवाल्यांवर कारवाई करणार का, असा प्रश्न नेरूळवासियांकडून उपस्थित करण्यात येत आहे.