स्वयंम न्यूज फुिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे. जर चार-पाच दिवसांमध्ये या समस्येचे निवारण न झाल्यास तेच पिवळसर दूषित पाणी नेरूळ विभाग अधिकाऱ्यांना व अन्य अधिकाऱ्यांना पिण्यासाठी देणार असल्याचा इशारा विद्या भांडेकर यांनी निवेदनातून दिला आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या नेरूळ सेक्टर 2,4 तसेच जुईनगर नोड परिसरात पाणीपुरवठा विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून पिवळसर स्वरूपातील दूषित पाण्याचा पुरवठा होवू लागला आहे. पाणी गाळून, उकळून जरी प्यावे लागत असले तरी उकळल्यानंतरही पाण्याचा पिवळसरपणा राहत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पिवळसर स्वरूपातील दूषित पाण्यामुळे रोगराई पसरण्याचा पर्यांयाने जिविताला धोका निर्माण होण्याची भीती आहे. दूषित पाण्यामुळे नागरिक उघडपणे पालिका प्रशासनावर संताप व्यक्त करू लागले आहेत. लवकरात लवकर आपण या समस्येवर तोडगा काढण्याचे संबंधितांना निर्देश द्यावेत. समस्येचे गांभीर्य पाहता जर चार-पाच दिवसात या समस्येवर तोडगा न निघाल्यास परिसरातील महिला आणून तेच पिवळसर पाणी नेरूळ विभाग अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना पिण्यास भाग पाडू असा इशारा विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.