स्वयंम न्यूज फिचर्स : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २ एल आय जी वस्तीशेजारील समाधान बियर शॉपीच्या होणाऱ्या त्रासातून स्थानिक नागरिकांना मुक्त करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्या भांडेकर यांनी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करून केली.
नवी मुंबई शहरातील बेलापुर विधानसभा मतदारसंघातील नेरूळ नोडमधील एका गंभीर समस्या विद्या भांडेकर यांनी या निवेदनातून मांडताना म्हटले आहे की, नेरुळ सेक्टर २ एल आय जी वस्ती शेजारी मिनी मार्केटमध्ये समाधान बियर शॉपी चालू आहे या शॉपीमध्ये येणारे तरुण मुले बियर घेऊन त्याच ठिकाणी पित बसतात व आजूबाजूच्या लोकांच्या दरवाज्यात लघुशंका करतात. भांडणे, राडा, गलिच्छ भाषेतील शिविगाळ हा प्रकार दररोज चालू असतो. त्याच ठिकाणी बाजूला चक्की आहे, चक्कीला लागूनच घर आहेत. चक्कीमध्ये दळण टाकण्यासाठी अथवा घेऊन जाण्यासाठी महिला तसेच मुलींची ये-जा असते. मारामाऱ्या, शिवीगाळ यामुळे घरातून बाहेर महिला, मुली पडत नाही. सायंकाळ झाल्यावर रस्त्यावर टोळके बियर पीत उभे असते. महिला व मुलींना तेथून ये-जा करणे अवघड झाले आहे. या वातावरणामुळे सभोवतालच्या लहान मुलांवर विपरीत परिणाम असून त्यांच्या संभाषणात सर्रासपणे शिव्या येऊ लागल्या असल्याचे विद्या भांडेकर यांनी यावेळी सांगितले.
बिअर शॉपीत या. माल घेवून जा. पण तिथेच पिणे योग्य नाही. संबंधित प्रकाराला आळा लवकरात लवकत घातला न गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता संबंधितांना याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
याप्रकरणी विद्या भांडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे यासह प्रशासकीय पातळीवर अन्यत्रही या समस्या निवारणासाठी निवेदन सादर केले आहे.