अनंतकुमार गवई
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहाच्या अंर्तगत भागात महापालिका प्रशासनाची परवानगी न घेता पदपथालगत, तसेच अंर्तगत रस्त्यावर खोदकाम करून परिसर बकाल करणाऱ्या महावितरणच्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पालिका प्रशासनाची कोणतीही लेखी परवानगी न घेता नेरूळ सेक्टर ६ परिसरात रस्त्याच्या कोपऱ्यावर पदपथाखालील गटारालगत लांबवर खोदकाम करणाऱ्या महावितरणने काम दिलेल्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी हे निवेदन सादर करत असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
पावसाळा आता अवघ्या ८ दिवसावर आलेला आहे. महापालिका या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारच्या खोदकामाला परवानगी देत नाही. महावितरणने नेरूळ सेक्टर सहामधील शिवम या सिडकोच्या सोसायटीलगत असलेल्या व मेरेडीयन सोसायटीच्या समोरील विद्युत डीपीपासून नेरूळ सेक्टर ६ परिसरातील अंर्तगत भागात महावितरणच्या ठेकेदाराने पदपथालगतच लांबवर विद्युत डीपी, शिवम सोसायटी, समाजमंदीर, तेथून दर्शन दरबार, व त्यापुढे अंर्तगत भागात खोदकाम करून केबल्सचे काम केलेले आहे. या ठिकाणी खोदकाम करून काढण्यात आलेले दगड, डांबराचे उखडलेले डेब्रिज तसेच टाकून खोदकाम केलेला भाग बुजविण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या २-३ दिवसात अथवा आठवडाभरात पाऊस आल्यास त्या खोदकामावरील माती, डेब्रिज वाहून जाण्याची शक्यता आहे. सध्या सुरू असलेल्या पदपथालगत तसेच रस्त्यावर झालेल्या खोदकामामुळे परिसराला बकालपणा आला असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
मुळातच महापालिका प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता महावितरणच्या ठेकेदाराने खोदकाम करणे हा गुन्हा आहे. याचा अर्थ नेरूळ विभाग कार्यालयाचा वितरणच्या ठेकेदारावर काहीही धाक नाही. आपण याप्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर विनापरवानगी खोदकाम केल्याप्रकरणी महापालिकेच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करावा व संबंधितांकडून रस्त्याची समपातळीवर डागडूजी करून घ्यावी. कारण खोदकाम करताना चढ झाल्यास पावसाळ्यात सोसायटी आवारातून पाणी बाहेर जाणे अवघड होईल. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून खोदकाम केलेल्या ठिकाणी रस्ता समपातळीवर डागडूजी करून घेण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.