नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – जुन्नर रोडवरील दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर विना भूसंपादन करता थेट २६ गुंठे जागेतील अतिक्रमणावर पोलीसी पाठबळावर डागडूजी करत न्यायालयीन केसबाबत जनतेला व प्रसिद्धीमाध्यमांना केस जिंकल्याची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करण्याची लेखी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे पोलिस महासंचालकांकडे एका निवेदनातून केली आहे.
पिंपळगाव-जुन्नर रोडवर उत्तम विष्णू खांडगे (वय वर्ष ७७) आणि चंद्रकांत विष्णू खांडगे (वय वर्ष ७१) या दोन भावांची पाच एकर जमिन आहे. या शेतातील तब्बल २६ गुंठे जमिनीवर अतिक्रमण झालेले आहे. याबाबत हे दोघे वयोवृद्ध भाऊ प्रशासकीय पातळीवर शेताचे भूसंपादन झालेले नसताना व एक रूपयाचाही मोबदला आजतागायत मिळालेला नसताना अतिक्रमण विस्तारत चालले आहे व त्यावर झुंडशाहीच्या बळावर पोलिसी पाठबळावर खतपाणी घातले जात आहे. याबाबत न्यायालयात सुनावणीही सुरु आहे. हे दोघे वयोवृद्ध शेतकरी भाऊ यासंदर्भातील कोणतीही न्यायालयीन केस हारलेले नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
न्यायालयात ६ डिसेंबर २०२२, ३ जानेवारी २०२३, १७ जानेवारी २०२३, १७ फेब्रुवारी २०२३, १४ मार्च २०२३, २६ एप्रिल २०२३, ३ मे २०२३, ६ मे २०२३ अशा याप्रकरणी सुनावण्या झाल्या असून न्यायालयाने आगामी तारीख १ जुलै २०२३ दिलेली असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.
भूंसंपादन झालेले नसताना वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण झालेले आहे. या शेतकऱ्यांना व्यवस्थित चालता येत नाही. वयोमानानुसार चालताना तोल जातो. दोन्ही शेतकऱ्यांना व त्यांच्या पत्नींना अनेक आजार आहेत. ३० मे रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून आले. हे अतिक्रमण याच दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या शेतीत झालेले असून प्रशासनाने या जमिनीचे कधीही भूसंपादन केलेले नाही व या दोन शेतकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता २०१३-१४ मध्येही दडपशाही व झुंडशाहीच्या बळावर अतिक्रमणाची डागडूजी केली व आजही ३० मे रोजी जिल्हा परिषद अधिकारी, पिंपळगावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य थेट जेसीपी घेवून अतिक्रमण झालेल्या विनाभूसंपादीत जागेवर डागडूजी (डांबरीकरण) करत आहे. आजही हे काम सुरू असल्याचे पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे.
जिल्हा परिषद अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य आम्ही न्यायालयात केस जिंकलो आहोत, खांडगे कंपनी केस हारली असे धडधडीत पोलिसांसमोर व प्रसिद्धीमाध्यमांसमोर व ग्रामस्थांसमोर असत्य बोलत होते. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिले. स्वत:चे आमच्या शेतातील अतिक्रमणावर फोटोसेशनही केले. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना केस हारल्याचे धडधडीत असत्य वक्तव्य करून न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत चुकीची दिशाभूल करणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करा. दोघा वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या जमिनीवर वर्षानुवर्षे भूसंपादन न करता एक पैसाचाही मोबदला न देता अतिक्रमण सातत्याने करण्याचे व अतिक्रमण विस्तारण्याचे धाडस या गावपुढाऱ्यांकडून सुरू आहे. आमच्या गावातील एक घटक मंत्रालयात असल्याने त्या ओळखीच्या बळावर तो ग्रामस्थांना अतिक्रमणाला साथ देत खतपाणी घालत आहे. आम्ही दोन शेतकरी भाऊ व परिवार संघर्ष करत आहे. न्यायालयीन सुनावणी सुरू असताना धडधडीतपणे बेमुलाम असत्य माहिती ग्रामस्थ व प्रसिद्धीमाध्यमांना देणाऱ्या पिंपळगावचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून आम्हाला याप्रकरणी न्याय द्यावा. आम्ही पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय की चंबळच्या खोऱ्यात? आमच्या शेतात दिवसाढवळ्या न्यायालयीन प्रक्रियेची खोटी माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व मंत्रालयात काम करून त्या ओळखीच्या बळावर आमच्या परिवाराची मुस्कटदाबी करणाऱ्या घटकापासून आमच्या परिवाराच्या जीवाला धोका आहे. आमचे दोन्ही परिवार कमालीच्या मानसिक दबावाखाली वावरत असून उद्या कोणाचा मानसिक धक्क्याने मृत्यू झाल्यास त्यास हेच घटक जबाबदार राहतील, याची आपण नोंद घ्यावी. साहेब, आमच्या परिवाराला न्याय हवाय, अशी मागणी पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनाच्या अखेरीस म्हटले आहे..