चौकशी करण्याची सविनय म्हात्रे यांची आयुक्तांकडे मागणी
स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्कच्या नूतनीकरण कंत्राटाच्या निविदेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदर निविदेप्रमाणे नूतनीकरण करताना खरेदी करण्यात आलेल्या राईडसच्या किंमतीत बाजारभावापेक्षा जास्त प्रमाणात तफावत आढळून आली आहे. सदर किंमती वाढवून या कंत्राटात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी केला आहे.
मनसे तर्फे राईडस बनविणाऱ्या वितरकाकडून या सर्व राईडसचे दरपत्रक मागविण्यात आले त्यानंतर निविदेत मंजूर करण्यात आलेले दर आणि सध्याच्या बाजारभावाप्रमाणे असलेले दर यात प्रत्येक राईड्स मागे ३० ते ४० लाखाचा फरक असल्याचे मनसे शिष्टमंडळाने महारपालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. म्युझिकल फाऊंटन आणि लेझर शो करिता तब्बल ७.३५ करोड खर्च दर्शविण्यात आला असून प्रत्यक्षात या म्युझिकल फाउंटनकरिता ३ ते ४ करोड खर्च अपेक्षित असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
महापालिकेतर्फे वंडर्स पार्कच्या नूतनीकरणासाठी २ निविदा काढण्यात आल्या, त्यातील वंडर्स पार्कमध्ये फेरबदल व सुधारणा करणे भाग -१ या कामास १० करोड २८ लाख इतका खर्च दाखविण्यात आला असून प्रत्यक्षात पाहणी केली असता छोटी मोठी डागडुजीची कामे करुन अवाढव्य खर्च दाखवून या कामात करोडोंचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे .
तर वंडर्स पार्कमध्ये फेरबदल व सुधारणा करणे भाग-२ या दुसऱ्या निविदेनुसार राईडसची खरेदी करण्याकरिता १५ करोड ९४ लाख इतका खर्च दाखविण्यात आला असून प्रत्यक्षात यामध्ये २ ते ३ करोडची तफावत आढळून आली आहे.
या दोन्ही कंत्राटामध्ये १० ते १२ करोड रुपयांचा भ्रष्टाचार कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने होत असल्याचा आरोप यावेळी सविनय म्हात्रे यांनी केला असून आयुक्तांना याबाबतीतील सर्व कागदपत्रे सादर करण्यात आली. तसेच या दोन्ही कंत्राटांची त्रयस्थ संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी आणि तोपर्यंत या कंत्राटदाराला संबंधित कंत्राटासाठी देण्यात येणारी सर्व देयके थांबवून या प्रकरणातील दोषी कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात मनसे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, महापालिका युनियन अध्यक्ष आप्पासाहेब कोठुळे, विभाग अध्यक्ष उमेश गायकवाड, समृद्ध भोपी, रोहित शिवतरे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.