स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडून पावसाळीपूर्व कामांचा नेहमीच गाजावाजा केला जातो. त्यामुळे पावसाळ्यात नेरूळ तसेच जुईनगर नोडमध्ये कोणतीही दुर्घटना घडून जिवित अथवा वित्त हानी झाल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासनच जबाबदार राहील असा लेखी इशारा नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना एका निवेदनातून दिला आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून नवी मुंबईत वरूण राजाने हजेरी लावली असून संततधार स्वरूपात पाऊस पडत आहे. पाऊसाने गती पकडण्यापूर्वी आणि पाणी तुंबणे, झाडाच्या फांद्या पडणे, मल:निस्सारण वाहिन्या चोकअप होणे, दूषित पाणी येणे, रस्त्यात खड्डे निर्माण होणे, पाणी साचणे, साथीचे आजार पसरणे यासह अन्य समस्यांचा उद्रेक होण्यापूर्वी नेरूळ आणि जुईनगरमध्ये पावसाळीपूर्व कामे कशी झाली आहेत, याबाबत आपण स्वत: अथवा अन्य अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने पाहणी अभियान राबवावे. कारण काही दिवसापूर्वीच थोड्याशा पावसात व वाऱ्यामध्ये नेरूळ सेक्टर सहामध्ये एक झाड रस्त्यावरील वाहनावर पडले होते. त्यामुळे पाऊस गती पकडण्यापूर्वी नेरूळ व जुईनगरमध्ये पावसाळा कालावधीत कोणतीही जिवित व वित्त हानीची कोणतीही समस्या निर्माण होवू नये यासाठी तातडीने उपाययोजना करावी. पावसाळीपूर्व कामांमध्ये काही निष्काळजीपणा दाखवून काही दुर्घटना घडल्यास त्यास सर्वस्वी महापालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.