स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरातील महापालिकेच्या नेरूळ सिव्ह्यू उद्यानाला भेट देण्याबाबत संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सुश्रुषा रूग्णालयासमोरच तसेच सीव्ह्यू या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटी आणि नेरूळ सेक्टर सहा व चार मधील चौकालगतच महापालिकेचे नेरूळ सिव्ह्यू उद्यान आहे. या उद्यानापासून हाकेच्याच अंतरावर हे महापालिकेचे विभाग कार्यालय आहे. आपण स्वत: या ठिकाणी भेट दिल्यास उद्यान स्वच्छतेबाबत महापालिका प्रशासनाचे उपायुक्त व संबंधित अधिकारी व कर्मचारी किती कार्यक्षमतेने व तत्परतेने काम करतात, याची आपणास ‘याचि देही, याचि डोळा’ प्रचिती येईल, असे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
या उद्यानात प्रवेश करण्यापूर्वी महापालिका उद्यानाच्या सभोवताली फेरीवाल्यांचा विळखा आपणास पहावयास दिसेल. हाकेच्या अंतरावर महापालिकेचे विभाग कार्यालय असतानाही हे फेरीवाले बिनधास्तपणे पदपथावर व्यवसाय करून उद्यानाला बकालपणा आणत आहेत. या उद्यानात प्रवेश करताना नामफलकावर नजर मारल्यास नामफलकावरील नावाचे विद्रुपीकरण व अक्षरे गळून पडलेली दिसून येतील. उद्यानात प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूलाच कचऱ्याचा ढिगारा गेल्या काही महिन्यापासून पडलेला दिसून येईल. याशिवाय उद्यानातील लोखंडी कठड्याच्या बाजूकडील भागात नेरूळ सिव्ह्यू या सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगत ओला कचरा, झाडाच्या फांद्या पडलेल्या दिसून येतील. उद्यानात दररोज सफाई झाली असती तर या उद्यानात कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळाले नसते तसेच बकालपणाही प्राप्त झाला नसता. आपण या ठिकाणी प्रत्यक्ष आल्यास उद्यानाला असलेला फेरीवाल्यांचा विळखा व उद्यानातील बकालपणा संपुष्ठात येईल. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. उद्यानातील कचऱ्यामुळे डासांना पोषक वातावरण मिळून स्थानिक रहीवाशांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागण्याची भीती आहे. आपण लवकरात लवकर या उद्यानाबाबत पाहणी अभियान राबविण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी केली आहे.