स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ आणि जुईनगर नोडमधील रहीवाशांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर २,४, एलआयजी वसाहत, जुईनगर नोडचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून सभोवताली अधिकांश सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. एलआयजी व जुईनगर नोडमध्ये अल्प व अत्यल्प तसेच मध्य उत्पन्न गटातील रहीवाशांचे निवासी वास्तव्य आहे. या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. येथील रहीवाशांचा डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराने मृत्यू झालेला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची टांगती तलवार आहे. नेरूळ व जुईनगर नोडमधील रहीवाशांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे, त्यांना घ्यावयाच्या काळजीबाबत अवगत करण्यात यावे, याशिवाय त्यांना आजार न होण्यासाठी व आजार झाल्यावर काय करावे याबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. महापालिका प्रशासनाने या नेरूळ व जुईनगर नोडमधील रहीवाशांसाठी मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांची आरोग्य तपासणी करावी, त्यांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ‘आरोग्य सप्ताहा’ शिबिराचे आयोजन करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.