स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील पाचही मार्केटमधील माथाडी घटकांसाठी ‘आरोग्य सप्ताह’ शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई उपाध्यक्ष व अखिल भारतीय माथाडी संघटनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील तुर्भेमध्ये राज्याच्या कृषी क्षेत्राच्या अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार सुरू आहे. अशिया खंडातील कृषी क्षेत्राशी संबंधित ही सर्वांधिक मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये कांदा बटाटा मार्केट, फळ मार्केट, भाजी मार्केट, धान्य मार्केट, किरणा दुकान मार्केट अशा पाच मार्केटचा समावेश आहे. या मार्केटमध्ये हजारोच्या संख्येने माथाडी, मापाडी, वारणार, पालावाल, मेहता अशा कर्मचाऱ्यांना कामा करावे लागत आहे. बाजार समिती आवारात दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. काही व्यापाऱ्यांचा तसेच माथाडींचाही डेंग्यू व अन्य साथीच्या आजाराने मृत्यू झालेला आहे. कृषी मालाशी संबंधित कांदा बटटा, भाजी व फळ मार्केटमध्ये कृषी मालाशी संबंधित कचरा बाराही महिने पडलेला आहे. त्याची दुर्गंधीही बाजार आवारातील घटकांना सहन करावी लागत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची टांगती तलवार आहे. बाजार आवारातील माथाडी घटकांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे, त्यांना घ्यावयाच्या काळजीबाबत अवगत करण्यात यावे, याशिवाय त्यांना आजार न होण्यासाठी व आजार झाल्यावर काय करावे याबाबत मार्गदर्शनाची गरज आहे. महापालिका प्रशासनाने या पाचही मार्केटमधील माथाडी गटकांसाठी प्रत्येकी एक दिवस मोठ्या प्रमाणावर आरोग्य शिबिर आयोजित करून माथाडींची तपासणी करावी, त्यांना साथीच्या आजाराबाबत मार्गदर्शन व्हावे यासाठी महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील माथाडी घटकांसाठी ‘आरोग्य सप्ताहा’ शिबिराचे आयोजन करण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.