स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सोमवार, दि. १० जुलै रोजी न्हावा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामध्ये लाभार्थी झालेल्या मच्छिमार बांधवांच्या बैठकीचे आयोजन केले आहे.
ही बैठक सोमवारी, सकाळी ११ वाजता आग्रोळी गावातील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या गौरव निवासस्थानी असलेल्या कार्यालयात होणार आहे. न्हावा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे वाहतुक कोंडीचे निवारण, दळणवळणाची सुलभता, मुंबई-नवी मुंबई-उरणशी ये-जा करण्याच्या वेळेतील बचत यासह अन्य फायदे होणार असल्याचे एकीकडे केंद्र व राज्य सरकार सांगत असतानाच दुसरीकडे बेलापुरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या प्रकल्पामुळे उरणसह नवी मुंबईतील मच्छिमार बांधवांच्या उपजिविकेवर परिणाम होणार आहे. मासेमारी व्यवसायाला घरघर लागणार आहे. पुलावरून जाणाऱ्या वाहनांमुळे पाण्यात हादरे बसतात, त्यामुळे स्थानिक मच्छिमारांना मासे भेटत नाही. त्यांच्या उपजिविकेचे काय? त्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी अशी भूमिका मांडत मच्छिमार बांधवांच्या नुकसान भरपाईसाठी व त्यांच्या रोजगारासाठी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी राज्य सरकारदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य सरकारने नुकसान भरपाई व रोजगार याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मच्छिमारांना आर्थिक मदतही सरकारच्या माध्यमातून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मिळवून दिली आहे. बाधित होणाऱ्या शेवटच्या मच्छिमाराला नुकसान भरपाई व रोजगार मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा कायम ठेवणार असल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी दिली.
न्हावा शिवडी ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामध्ये लाभार्थी झालेल्या मच्छिमार बांधवांच्या समस्या या बैठकीत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे जाणून घेणार आहेत व त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.