सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ-जुईनगरमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईत गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे जुईनगर व नेरूळ नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर शेवाळ साचण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस अजून पाच-सहा सतत राहील्यास हे शेवाळ वाढून पदपथ निसरडे होण्याची शक्यता आहे. पदपथ निसरडे झाल्यास त्यावरून ये-जा करणारे महिला-पुरूष, मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक चालताना घसरून पडण्याची व त्यांना दुखापत होण्याची भीती आहे. समस्या निर्माण होण्यापूर्वी व त्या समस्येमुळे इतरांना त्रास होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाने नेरूळ व जुईनगर नोडमधील पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करून पदपथावर शेवाळ साचणार नाही, याची काळजी घ्यावी की जेणेकरून लोकांना पदपथावरून ये-जा करताना त्रास होणार नाही. त्यामुळे समस्येचे गांभीर्य पाहता आपण जुईनगर व नेरूळ नोडमधील अंर्तगत व बाह्य रस्त्यावरील पदपथावर ब्लिचंग पावडरची फवारणी करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी श्रीमती विद्याताई भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.