सुवर्णा खांडगेपाटील : navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र भाजपचे नेते व महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस कोपरखैराणे प्रभाग ४२ मध्ये समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
लोकनेते आमदार गणेश नाईक सूचनेनुसार व नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या संकल्पनेतून प्रभाग ४२ मध्ये समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील आणि सुनिकेत हांडेपाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सफाई कामगारांच्या योगदानामुळे तसेच परिश्रमामुळे महाराष्ट्र राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईला सलग दोन वेळा राज्यात प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले होते. देशपातळीवर स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नवी मुंबई महापालिकेला मिळणाऱ्या पुरस्कारांमध्ये सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे.
सफाई कामगारांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सध्या पावसाळ्याचे दिवस आणि सुरू असलेला मुसळधार पाऊस या पार्श्वभूमीवर समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी सफाई कामगारांना देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त छत्र्यांचे वाटप केले. सफाई कामगारांना सुनिता देविदास हांडेपाटील यांनी दिलेल्या छत्र्यांमध्ये कुठेही स्वत:चे अथवा पक्षसंघटनेचे नाव व निवडणूक चिन्ह नव्हते. सफाई कामगार नवी मुंबईमध्ये सफाईचे काम करत असल्याने त्यांना कोठेही राजकीय गालबोट लागू नये व त्यांना कोणी अडचणीत आणू नये म्हणून समाजसेविका श्रीमती सुनिता देविदास हांडेपाटील यांनी ही काळजी घेतली. त्यांच्या या संकल्पनेचे कोपरखैराणेवासियांकडून स्वागत करण्यात आले आहे.