Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील पदपथावर ब्लिचिंग पावडर फवारण्याची कॉंग्रेसची मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये असलेल्या महापालिकेच्या उद्यानात मॉर्निग वॉकच्या मार्गिकेवरील लाद्यांवर शेवाळ साचल्याने रहीवाशी सकाळी व संध्याकाळी चालण्यासाठी आल्यावर घसरून पडत आहेत, त्यांना दुखापती झाल्या आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या उद्यानातील मार्गिकेवर तसेच नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर लवकरात लवकर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे शनिवार, दि. २९ जुलै रोजी एका लेखी निवेदनातून केली आहे. यापूर्वीही या समस्या निवारणासाठी जीवन गव्हाणे यांनी १७ जुलै रोजी महापालिका आयुक्तांकडे तक्रारपत्र सादर केले होते.
महापालिका प्रभाग ८६ मध्ये नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गावाचा समावेश होत आहे. गेल्या एक महिन्यापासून नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. संततधार पाऊस पडत असल्याने पदपथावर शेवाळ साचून पदपथ निसरडे होण्यास सुरूवात झाली आहे. चार-पाच दिवसात पदपथावरून ज्येष्ठ नागरिक व महिला घसरून पडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे कोणाला मोठी दुर्घटना होवून दुखापत होणे अथवा हात-पाय फ्रॅक्चर होणे अशी दुर्घटना घडण्याअगोदर पदपथावर पालिका प्रशासनाने ब्लिचिंग पावडरची फवारणी करून पदपथ चालण्यायोग्य करणे आवश्यक आहे. नेरूळ सेक्टर सहामध्ये महापालिकेच्या असलेल्या उद्यानात मॉर्निग वॉकसाठी बसविण्यात आलेल्या मार्गिकेवरील लाद्याही शेवाळल्या असल्याने दररोज कोणा ना कोणी येथे पडून दुखापत होत आहे. आपण स्वत: या उद्यानात लाद्या असलेल्या मार्गिकेची पाहणी केल्यास आपणास समस्येचे गांभीर्य समजून येईल. नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगत असलेल्या पदपथावरही हेच प्रकार घडू लागले आहेत. उद्यानात चालावयास येणारे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक घसरून जायबंदी होण्याची भीती आहे. त्यामुळे नेरूळ सेक्टर सहा परिसरात आणि सारसोळे गावातील अंर्तगत व बाह्य रस्त्यालगतच्या पदपथावर तसेच नेरूळ सेक्टर सहामधील वरूणा, सीव्ह्यू आणि दत्तगुरू, सागरदिप या सिडको वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या पालिकेच्या उद्यानात ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे आपण संबंधितांना निर्देश देवून सारसोळे गावातील ग्रामस्थांना आणि नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका प्रशासनाकडे जीवन गव्हाणे नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावातील नागरी समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत असल्यामुळे कॉंग्रेस पक्षसंघटनेची जनसामान्यांमध्ये चर्चा होवू लागली आहे.