Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : वृक्षछाटणी न झाल्याने वाहनांची दोनदा हानी झाल्यामुळे नेरूळ सेक्टर सहा आणि सारसोळे गाव परिसरात तातडीने वृक्षछाटणी अभियान राबविण्यासाठी संबंधितांना निर्देश देण्याची लेखी मागणी सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसराचे प्रभाग ८६ मधील कॉंग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे ३१ जुलै रोजी केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात व सारसोळे गावात वृक्षछाटणी करण्याबाबत महापालिका आयुक्तांना जीवन गव्हाणे यांनी २० जुलै २०२३ रोजीही निवेदन सादर केले होते. पालिका आयुक्तांनी ते कार्यवाहीसाठी तात्काळ Addiltional Commissioner City <addlcommcity@nmmc.gov.in>, DMC SWM dmc_swm@nmmc.gov.in यांच्याकडे कार्यवाहीसाठी फॉरवर्डही केले. तथापि कार्यवाही झाली नाही. रविवार, दि. ३० जुलै रोजी नेरूळ सेक्टर सहामधील विक्रम बारसमोरील रस्त्यावर धावत्या गाडीवर झाड पडून वाहनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. वाहनामध्ये नवरा-बायको व दोन मुले असा परिवार होता. त्यांना उपचारासाठी एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात नेरूळ सेक्टर सहामध्ये विक्रम बार ते पालिका समाजमंदिर या अंर्तगत मार्गावर डॉ. सोनावणे यांच्या दवाखान्याजवळ एक झाड एका वाहनावर पडले होते. समस्येचे गांभीर्य वेळोवेळी जीवन गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास निवेदनाच्या माध्यमातून आणून दिलेले आहे. आयुक्तही तात्काळ दखल घेत संबंधितांना फॉरवर्ड करत आहात. परंतु संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नाही. दोनदा वाहनांची हानी झाली. आता महापालिका प्रशासन जिवितहानी झाल्यावरच वृक्षछाटणी करणार आहे काय? असा संतप्त सवाल जीवन गव्हाणे यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.
नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५ वरील सिडकोची शिवम सोसायटीच्या मंदिरालगतच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडल्यावर मेरेडियनच्या दिशेने वळल्यावर पदपथावरच झाडाच्या फांद्या झुकलेल्या दिसतात, बाजूलाच महावितरणचे उपकेंद्र असल्याने चुकुन फांद्यामध्ये पावसात विद्युत प्रवाह आल्यास त्या ठिकाणाहून ये-जा करणारे जागीच दगावण्याची भीती आहे. तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका समाजंदीराजवळ एका बाजूच्या वृक्षाच्या फांद्यांची छाटणी केली तर एका बाजूच्या रस्त्यावरील झाडांच्या फांद्यांची आजतागायत छाटणी झाली नाही. या झाडांच्या फांद्यांची छाटणी न झाल्यास येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची अथवा पादचाऱ्यांची हानी होण्याची दाट शक्यता आहे. नेरूळ सेक्टर सहा वस सारसोळे गावात ज्या ज्या ठिकाणी रस्त्यालगत झाडांच्या फांद्या वाढल्या असतील अथवा धोकादायक असतील त्या फांद्या तसेच झाडांची लवकरात लवकर छाटणी करावी अशी मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.