Navimumbailive.com@gmail.com – ९८२००६५९७३, ८३६९९२४६४६
नवी मुंबई : उद्यानाच्या सभोवताली अनधिकृतरित्या फेरीवाल्यांचे अतिक्रमण, उद्यानामध्ये व सभोवताली बाराही महिने लागलेले अनधिकृत होर्डीग, उद्यानात सतत असणारे कचऱ्याचे ढिगारे आणि त्यामुळे स्थानिक रहीवाशांना सहन करावा लागणारा डासांचा व दुर्गंधीचा त्रास, उद्यानाची स्वच्छता ठेवण्यात पालिकेची उदासिनता यामुळे नेरूळ सेक्टर सहामधील ‘सीव्ह्यू नेरूळ’ उद्यानाला डम्पिंग ग्राऊंड जाहिर करण्याची लेखी मागणी सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहामधील वॉर्ड क्रमांक ८६ चे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सुश्रुषा रूग्णालयासमोरच नेरूळ सेक्टर ४ आणि ६च्या चौकात महापालिकेचे ‘सीव्ह्यू नेरूळ’ हे उद्यान आहे. गेल्या काही महिन्यांपासून या उद्यानाला पालिकेच्याच सौजन्याने बकालपणा आलेला आहे. या उद्यानाच्या सभोवताली बाराही महिने अनधिकृत होर्डींगचा विळखा असतो. तसेच उद्यानाच्या बाहेर असलेल्या पदपथावर फेरीवाल्यांनी कायमस्वरूपी बस्तान मांडत अतिक्रमण केलेले आहे. येथून काही अंतरावरच पालिकेचे विभाग कार्यालय असतानाही फेरीवाल्यांचे व महापालिका विभाग अधिकारी कार्यालयाचे ‘प्रेमाचे’ संबंध असल्याने या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावर कारवाई केली जात नाही. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांकडेच महापालिकेच्या प्रवेशद्वाराची चावी असून फेरीवालेच उद्यानातील पाणी वापरत असून आपले सामानही उद्यानातील गजोबामध्ये ठेवतात. या उद्यानाचा नामफलक गेल्या काही महिन्यापासून दुरावस्थेत असून ‘सीव्ह्यू नेरूळ’ ही अक्षरेही कोणाला वाचता येत नाही. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच गेल्या काही महिन्यापासून कचऱ्याचे ढिगारे आहेत. त्यामुळे या उद्यानाचा स्थानिक रहीवाशांना वापरासाठी काहीही फायदा होत नसून उलट उद्यानात असलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचा व डासांच्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे जीवन गव्हाणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
या उद्यानाचे अनधिकृत होर्डींगच्या व सभोवतालच्या पदपथावर असणाऱ्या फेरीवाल्यांच्या विळख्यातून मुक्तता करावी. उद्यानातील पाण्याचा होत असलेला गैरवापर थांबवावा. उद्यानाच्या प्रवेशद्वाराची चावी फेरीवाल्याकडे नव्हे तर पालिका कर्मचाऱ्यांकडे असावी. तसेच उद्यानाच्या आतील भागात असणारे कचऱ्याचे ढिगारे तातडीने हटवावेत. स्थानिक रहीवाशी डासांमुळे व दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. महापालिका प्रशासनाला ‘सिव्ह्यू नेरूळ’ उद्यानाची समस्यातून मुक्तता करता येत नसेल व अंर्तगत भागात कचऱ्याचे ढिगारे कायमस्वरूपी ठेवायचे असतील तर या उद्यानाला पालिका प्रशासनाने ‘डम्पंग ग्राऊंड’ जाहिर करावे, अशी मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.