नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २३ मधील महापालिकेचे शाहीर कृष्णा पाटील उद्यान स्थानिक रहीवाशांकरता अन्य उद्यानाप्रमाणेच अधिकाधिक वेळ उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्याताई भांडेकर आणि कॉंग्रेसचे जुईनगर विभाग अध्यक्ष महानंद रामराजे यांनी एका संयुक्त निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे केली आहे.
जुईनगर सेक्टर २३ मध्ये महापालिकेचे शाहीर कृष्णा पाटील हे उद्यान आहे. या उद्यानात सभोवतालच्या जुईनगर नोडमधील, जुई गावातील तसेच साडे बारा टक्के भुखंडावरील इमारतीमधील रहीवाशी येतात. या उद्यानात व्यायामासाठी (ओपन जीम) स्थानिक रहीवाशांकरता साहित्यही उपलब्ध आहे. या उद्यानाचा चालण्यासाठी व व्यायामासाठी स्थानिक रहीवाशांना उपयोग होतो. नवी मुंबई शहरातील महापालिकेची अन्य उद्याने सकाळी लवकर सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यत सुरू असतात. जेणेकरून सकाळी व्यायामासाठी तर रात्री जेवण झाल्यावर चालण्यासाठी रहीवाशांना उद्यानाचा वापर व्हावा हा हेतू असतो. मात्र शाहीर कृष्णा पाटील हे उद्यान दुपारी १२ वाजता स्थानिक रहीवाशांसाठी सुरू होते आणि सांयकाळी ६ ते ७ वाजता पुन्हा बंद केले जाते. हा काय प्रकार आहे? उद्यानाची ही अवेळ कोणी निश्चित केली आहे? यामुळे स्थानिक रहीवाशांना ना सकाळी आणि ना संध्याकाळी उद्यानाचा चालण्यासाठी तसेच व्यायामासाठी वापर करता येत नसल्याचे विद्याताई भांडेकर आणि महानंद रामराजे यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण स्थानिक रहीवाशांची अवेळी उद्यानाच्या वेळेसंदर्भामुळे गैरसोय होत असल्याने नवी मुंबईतील अन्य उद्यानाप्रमाणेच शाहीर कृष्णा पाटील हे उद्यान सकाळी लवकर किमान सहा वाजता सुरू करावे आणि रात्री अकरा वाजता बंद करण्यासाठी संबंधितांना निर्देश देवून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी विद्याताई भांडेकर आणि महानंद रामराजे यांनी केली आहे.