गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील पालिका क्रिडांगणासह उद्यानात मुषक नियत्रंण अभियान राबवण्याची लेखी मागणी सारसोळे गाव व नेरूळ सेक्टर सहा परिसरामधील वॉर्ड क्रं ८६ चे कॉंग्रेसचे वॉर्ड अध्यक्ष जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडे एका निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील सिडको वसाहतीमध्ये महापालिकेचे राजमाता जिजाऊ उद्यान आणि नरवीर तानाजी मालुसरे क्रिडांगण आहे. या उद्यान व क्रिडांगणात गेल्या अनेक महिन्यांपासून मूषक नियत्रंण अभियान राबविण्यात आलेले नाही. आपण या ठिकाणी फेरफटका मारण्यास यावे. उंदरांनी क्रिडांगणात मोठी बिळे केल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. तोच प्रकार उद्यानातही आहे. उद्यान व क्रिडांगणात तसेच मॉर्निग वॉकच्या मार्गिकेलगतही उंदरांनी बिळे केलेली आहे. उंदीर खाण्यासाठी त्यांच्या मागे नाग व साप येत असल्याने स्थानिक रहीवाशांना उद्यान व क्रिडांगणात त्यांचे दर्शन स्थानिक रहीवाशांना नियमित होत असते. क्रिडांगणात वाढलेले जंगली गवत काढण्यात आले असले तरी ते गवत हटविण्याची कार्यवाही अजून झालेली नाही. दोन दिवसापूर्वी लहान मुलांना (शनिवारी) खेळताना साप दिसला होता. या उद्यान व क्रिडांगणासभोवताली फेरीवाल्यांचे बाराही महिने अतिक्रमण असून ते आपल्या व्यवसायाचा कचरा व साहित्य क्रिडांगण व उद्यानात फेकत असल्याने बकालपणा आला आहे. आपण सुशोभीकरणातून उद्यान व क्रिडांगण वगळले तर नाही ना? नेरूळ सेक्टर सहामधील पालिकेच्या दोन्ही उद्यानांना बाराही महिने फेरीवाल्यांचा विळखा पडलेला आहे. आपण ही दोन्हॅी उद्याने फेरीवाल्यांच्या विळख्यातून कायमस्वरूपी मुक्त करावी आणि उद्यान व क्रिडांगणाला उंदरांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी या ठिकाणी आठवड्यातून एकदा मूषक नियत्रंण अभियान राबविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी जीवन गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.