गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ९ भुखंड क्रमांक ३ वरील क्रिडांगणाच्या नामफलकाची दुरावस्था तात्काळ हटविण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सानपाडा सेक्टर ९ परिसरातील भुखंड क्रमांक ३ वर महापालिकेचे क्रिडांगण आहे. महापालिका प्रशासनाला या क्रिडांगणाला झाशीची राणी खेळाचे मैदान असे नाव दिलेले आहे. झाशीची राणी हे नाव नवी मुंबई, महाराष्ट्रात नाहीतर समस्त भारत देशामध्ये आदराने घेतले जात आहे. १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामामधील हे एक मानाचे पर्व आहे. त्या नावाचा आदर हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. स्वातंत्र्यांची ती प्रेरणा आहे. महापालिका प्रशासन अनेक ठिकाणी उद्यान, क्रिडांगण. समाजमंदीर, शाळा, रस्ते व अन्य सार्वजनिक उपक्रमांना राष्ट्रपुरूषांची, स्वातंत्र्य सेनानींची नावे देते, पण त्या नामफलकांची नंतर काळजी घेत नाही, हे खेदाने नमुद करावे लागते. नवी मुंबईत हे अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून या क्रिडांगणाच्या झाशीची राणी खेळाचे मैदान या नामफलकाची दुरावस्था झालेली आहे. या नामफलकातील नावे गळून गेली असून नामफलकाची दुरावस्था झाली आहे. आपणास माहितीस्तव नामफलकाचे छायाचित्र सादर करत आहोत. गेली अनेक महिने आम्ही या नामफलकाच्या दुरूस्तीसाठी पालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावा करत आहोत. प्रशासन या समस्येचे व लोकभावनेचे महत्व जाणत नाही, याचे शल्य वाटते. संबंधितांना तात्काळ या नामफलकाची दुरूस्ती करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.