नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ऐरोली, उलवा आणि विमानतळ परिसराकरता स्वतंत्र पोलीस ठाण्याची तातडीने निर्मिती करण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हे महाराष्ट्रातील विस्तिर्ण असे पोलीस आयुक्तालय आहे. या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दिघा ते बेलापुर हा नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्राचा परिसर तसेच पनवेल-खारघर, तळोजासह पनवेल महापालिका परिसर, उरणपर्यतच्या परिसराचा समावेश होत आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण असा त्रिकोणी भौगोलिक परिसर विस्तारलेला आहे. नागरीकरण विकसित झालेले आहे. लोकसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. जुन्या इमारती पाडून टॉवर बांधले जात आहे. लोकसंख्येच्या स्फोटाच्या उंबरठ्यावर नवी मुंबई, पनवेल. उरण परिरसर येवून ठेपलेला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीसी संख्याबळ तुटपुंजे आहे. पोलीस ठाण्यावर त्या त्या भागात असलेला संरक्षणाचा कार्यभार प्रचंड आहे. त्यामुळे अनेकदा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे,.
आजमिनतीला नवी मुंबईत घणसोली व उरण-पनवेल कार्यक्षेत्रात उलवा तसेच विमानतळ परिसरात स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे. रबाले पोलीस स्टेशनच्या नियत्रंणात ऐरोली व सभोवतालची गावे तसेच घणसोली गाव आणि घणसोली कॉलनी परिसर आहे. कोपरखैराणे व रबाले पोलीस स्टेशनच्या मध्यभगी असणारा भाग पूर्णपणे रबाले पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत आहे. घणसोली गाव आणि घणसोली कॉलनॅी परिसराची लोकसंख्या लाखाहून अधिक आहे. येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होतच असतो. ऐरोली ते घणसोली या परिसरातील कायदा व सुव्यस्था राखण्यास स्थानिक पोलीस स्टेशनला मर्यादा पडत आहेत. त्यातच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिसरात लोकसंख्येच्या मानाने पोलीसी संख्याबळही तुटपुंजेच आहेच. घणसोलीची माथाडी व ग्रामस्थ झालेली होळीच्या पार्श्वभूमीवरील २००६ सालची दंगल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. घणसोली कॉलनीत आज लहान घटना असो वा मोठी, काहीही घडले तरी ऐरोली परिसराकडे रबाले पोलीस ठाण्याकडे धाव घ्यावी लागते. यासाठी रिक्षाचा खर्च करावा लागतो. यात वेळेचा व पैशाचा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर घणशोली गाव, घणसोली कॉलणी व दर्गा व इतर परिसराकरता स्वतंत्र पोलीस ठाण्याची तातडीने निर्मिती होणे आवश्यक आहे.
उलवा हा उरण तालुक्यामध्ये गेल्या सहा-सात वर्षात वेगाने विकसित झालेला परिसर आहे. या परिसरात नागरीकरण वेगाने झालेले आहे. लोकसंख्या कमालीची वाढलेली आहे. कानाकोपऱ्यात इमारतींचे जाळे विखुरलेले आहे. या उलवे शहराला एनआरआय पोलीस स्टेशन लागते. उलवे कोठे व एनआरआय पोलीस स्टेशन कोठे, याचा आपण अंदाज घ्या. उलव्यात काहीही घडल्यास एनआरआय पोलीस स्टेशनला रिक्षाने यावे लागते. यात वेळेचा व पैशाचा अपव्यय होतो. त्यात पुन्हा घटनास्थळी पोलीस येईपर्यत संबंधित घटक फरार झालेले असतात, त्यामुळे विकसित झालेल्या उलवे नोडकरता स्वतंत्र पोलीस ठाण्याची लवकरात लवकर निर्मिती करणे कायदा व सुव्यवस्थेसाठी काळाची गरज असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
नवी मुंबई विमानतळाचे काम वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्णत्वास येईल. विमानतळाच्या सभोवतालीही नागरीकरण विकसित झालेले आहे. या विमानतळाच्या परिसरासभोवताली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घणसोली, उलवा व विमानतळ परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे. स्थानिक रहीवाशांची मागणी आहे. पोलीस चौक्या करून कायदा व सुव्यवस्था नियत्रंणात येणार नाही. अनेक पोलीस चौक्यांना टाळे लागलेले आहे. पोलीसी संख्याबळच अपुरे आहे तेथे पोलीस चौक्या काय करणार? समस्येचे गांभीर्य लक्षात गृहमंत्रालयाशी तातडीने चर्चा करून घणसोली, उलवा आणि विमानतळ परिसराकरता स्वतंत्र पोलीस ठाण्यांची निर्मीती करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.