आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केलेल्या मागणीला यश
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात. गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे. घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात. कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो. नवी महानगरपालिकेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन केले जात होते. परंतु कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे काही काळासाठी बंद करण्यात आलेली ही स्पर्धा आजतागायत पुन्हा सुरु न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता याच अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबई महानगरपालिक आयुक्त राजेश नार्वेकर यांना बंद असलेली सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा पुन्हा सुरु करावे असे ११ सप्टेंबर २०२३ रोजीच्या पत्राद्वारे कळविले होते. याच पत्राच्या मागणीला साजेशा असा मान देत पुन्हा एकदा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घेतल्यामुळे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईकरांच्या वतीने आभार मानले आहे. तसेच या स्पर्धात्मक वातावरणामुळे नवनवीन आशयाचे समाज प्रबोधनात्मक देखावे साजरे करण्यास मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे, दिशा मिळणार आहे, प्रेरणा मिळणार आहे, त्याच बरोबर नवी मुंबई महानगरपालिकेसारख्या एका कुटुंब प्रमुख संस्थेकडून पाठीवर कौतुकाची थाप पडणार असल्यामुळे सहाजिकच गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सतत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सदस्यांनी तयार केलेले नवनवीन आशयाचे समाज प्रबोधनात्मक देखावे नवी मुंबईतील नागरिकांना पहावयास मिळणार आहे.
तसेच नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील अध्यक्ष, सचिव व सदस्यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून आभार व्यक्त केले आहे.