स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाची बकालपणाच्या विळख्यातून तातडीने मुक्तता करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला व वाहतुक पोलिसांना निर्देश देण्याची लेखी मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव व रायगड-नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिकेचे वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येथे उपचारासाठी येतात. नागरी आरोग्य केंद्र, माता बाल रूग्णालयातूनही उपचारासाठी येथे रुग्ण पाठविले जातात, इतकेच नाही तर मानखुर्द, गोवंडी, पनवेल, उरण भागातूनही रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. दर्जेदार आरोग्य सुविधा येथे उपलब्ध आहेत. या रुग्णालयात रूग्णासोबत रुग्णांचे नातेवाईकही येत असतात. आपण स्वत: रुग्णालयाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर सर्वसामान्य नवी मुंबईकर म्हणून रिक्षातून भेट द्या. रूग्णालय बकालपणाच्या विळख्यात व वाहतुक कोंडीच्या विळख्यात अडकलेले पहावयास मिळेल, असे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रवेशद्वारातून रुग्णालयात प्रवेश करण्यापूर्वीच दोन्ही बाजूला रिक्षांच्या रांगा लागलेल्या दिसून येतील. हा अंर्तगत रस्ता असून दोन्ही बाजला रिक्षा उभ्या असल्याने अन्य वाहनांना या ठिकाणाहून ये-जा करताना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय महापालिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापाशी पदपथावरच दुचाकी वाहनांची पार्किग असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पदपथाचा वापर करता येत नाही. त्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. दोन्ही बाजूला रिक्षा उभ्या असताना तसेच ये-जा करणारी अन्य वाहने ही कोंडी चुकवत रुग्ण व रुग्णांच्या नातलगांना रुग्णालयात ये-जा करावी लागते. आपण स्वत: या ठिकाणी येवून पाहणी करावी. पाहणी करायला येणार आहे म्हणून कोणालाही सूचना देवू नका. आरटीओचे वाहतुक अधिकारी सोबत आणा. समस्येचे गांभीर्य प्रत्यक्ष अनुभवता येईल. पदपथ दुचाकी वाहनांच्या पार्किगमधून मुक्त करावा. रिक्षांना उभी करण्यासाठी शिस्त लावावी. कारण बाजूला शाळा असल्याने तेथून शालेय बसही ये-जा करतात. कचरा घेवून जाणारे वाहन आल्यावर त्या वाहनाला बाहेर काढेपर्यत कचरा वाहक वाहनाच्या चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून पालिकेच्या रुग्णालयाला वाहतुक कोंडीचा व बकालपणाचा विळखा पडला आहे. आपण नवी मुबई महापालिकेला तसेच नवी मुंबई वाहतुक पोलिसांना या समस्येचे निवारण करण्याचे निर्देश देण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव व रायगड-नवी मुंबईचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.