संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाची ‘कचरामुक्त भारत’ ही संकल्पना आबे. या अनुषंगाने कचरामुक्त शहरांच्या उभारणीत प्रामुख्याने युवकांचा सहभाग ही संकल्पना नजरेसमोर ठेवून गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी ‘इंडियन स्वच्छता लीग २.०’ आयोजित करण्यात आलेली आहे.
या आंतर शहर स्पर्धेमध्ये देशातील ४ हजाराहून अधिक शहरे सहभागी झाली असून मागील वर्षी देशातील सर्वाधिक युवक सहभागाचे प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळविणारे शहर हा नवी मुंबईचा नावलौकिक कायम राखण्यासाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिका नागरिकांच्या सहयोगाने सज्ज आहे.
यादृष्टीने १२ सप्टेंबरपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी वंडर्स पार्क येथे अभिनव स्वरूपात ‘स्वच्छतेची डिजीटल शपथ’ हा आगळावेगळा उपक्रम राबविला जात आहे. त्याकरिता नवी मुंबईचे विशेष आकर्षणकेंद्र असणाऱ्या सेक्टर १९ ए नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये ‘एक दिवसाकरिता विनामूल्य प्रवेश’ जाहीर करण्यात आलेला आहे.
सकाळी ७ ते रात्री १० या वंडर्स पार्कच्या वेळेत नागरिकांना वंडर्स पार्क येथे विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून वंडर्स पार्कच्या मुख्य प्रवेशव्दारावर डिजीटल शपथ घेण्यासाठी उपकरणे ठेवली जाणार आहेत. यादिवशी साधारणत: २५ हजारहून अधिक नागरिक ये-जा करून डिजीटल शपथ घेतील असे अपेक्षित असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
तरी विदयार्थी, युवक, महिला बचतगट व महिला मंडळे, विविध प्रकारच्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, लोकप्रतिनिधी, आबालवृध्द नागरिक अशा सर्व नवी मुंबईकर नागरिकांनी स्वच्छता ही नवी मुंबई शहराची ओळख अधोरेखित करण्यासाठी शनिवार दि. १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत आपल्या सोयीच्या वेळी वंडर्स पार्कला कुटुंबिय व मित्रपरिवारासह आवर्जून भेट द्यावी आणि स्वच्छतेच्या डिजीटल शपथ मोहीमेत सहभाग घ्यावा तसेच वंडर्स पार्कच्या नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.