संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस – पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा ढोल पिटला जात असला तरी हा फक्त आकड्यांचा खेळ आहे, प्रत्यक्षात जनतेच्या हाती जेव्हा काही लागेल तेंव्हाच ते कळेल. मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या मराठवाड्यात वाढलेल्या आहेत अशा परिस्थितीत दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते पण राज्य सरकारने दुष्काळ जहीर न करून शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, येड्याचे (EDA) अख्खे सरकार दोन दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये जनतेचे कोट्यवधी रुपये खर्चून मौजमजा करुन परतले. मराठवाड्यात काही हजार कोटींच्या योजना दिल्याचे जाहीर केले, पण त्या प्रत्यक्षात कधी येतील हे सांगता येत नाही. संपूर्ण मराठवाडा दुष्काळाच्या झळा सहन करत आहे. खरीप वाया गेले आहे. मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढलेली आहे, जनावरांना चारा नाही, शेतकऱ्याला मोठ्या मदतीची गरज आहे पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेले दिसत नाही. आज जाहीर केलेल्या योजनांमध्ये जास्तीत जास्त योजना ह्या जलसंपदा विभागाच्या दिसतात, हे प्रकल्प दिर्घकालीन आहेत. सध्या मराठवाड्यातील जनतेला काय हवे, ते मात्र सरकारने दिलेले नाही. कृषीमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यातच १६८ शेतकऱ्यांनी मागील दिड-दोन महिन्यात आत्महत्या केल्या आहेत, इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थीती आहे पण सरकारने त्यावर काहीही उपाय योजना जाहीर केल्या नाहीत. खरीप वाया गेल्यातच जमा आहे, त्यासाठीही काही मदत जाहीर केली नाही. मराठवाड्यातील तरुण नोकऱ्यांसाठी मुंबई-पुणे सारख्या शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत त्यांच्या रोजगारासाठी राज्य सरकारने ठोस योजना जाहीर केलेली नाही हे मराठवाड्याचे दुर्दैव आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारने काहीच केले नाही हे सांगत होते त्यावेळी त्यांच्या शेजारी एकनाथ शिंदे व अजित पवार बसलेले होते पण यापैकी एकानेही फडणवीसांचे म्हणणे खोडून काढले नाही, मग शिंदे व पवार मविआ सरकारमध्ये काय करत होते? मंत्रिमंडळ बैठकीसाठी पंचतारांकीत हॉटेलमध्ये राहून उधळपट्टी केल्याचा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर देताना, इंडिया आघाडीचे नेते पंचतारांकित हॉटेलमध्येच थांबले होते, ते काही धर्मशाळेत राहिले होते का? असा प्रतिप्रश्न केला. पण इंडिया आघाडीच्या बैठकीचा खर्च हा काही जनतेच्या पैशातून केलेला नव्हता हे मुख्यमंत्री शिंदे यांना माहित नाही का? छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत, ‘ते बोलून झाले मोकळे आणि मराठवाड्याच्या हाती फक्त भोपळे’ असेच म्हणाले लागेल, अशी कोपरखिळी नाना पटोले यांनी मारली.