संपादक : सौ. सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने उत्तम कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटला होता. कोरोनाचे दोन वर्षांचे भिषण संकट, भाजपाकडून केंद्रीय संस्था आणि राज्यपालांच्या माध्यमातून केली जाणारी षडयंत्रे यावर मात करत राज्यातील गुंतवणूक व रोजगार निर्मितीत मविआ सरकारने फडणवीस व शिंदे सरकारपेक्षा सरस कामगिरी केली आहे. स्वतःची पापं झाकण्यासाठी ऊठसूठ महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप प्रणित एकनाथ शिंदे सरकारला ही मोठी चपराक आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
माहितीच्या अधिकारात (RTI) मिळालेल्या माहितीत मविआची कामगिरी उत्कृष्ठ होती हे स्पष्ट दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळात राज्यात १८ लाख ६८ हजार ०५५ नवीन सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) स्थापन झाले. हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या पाच वर्षांच्या स्थापन झालेल्या १४ लाख १६ हजार २२४ पेक्षा साडे चार लाखांच्या संख्येने जास्त आहेत.
रोजगाराच्या आघाडीवरही मविआ सरकारच्या ३० महिन्यांच्या काळात ८८ लाख ४७ हजार ९०५ नोकऱ्या निर्माण झाल्या. हे प्रमाणही फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील नोकऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे. मविआ सरकार पाडल्यानंतर नवीन उद्योगांची संख्या ८ लाख ९४ हजार ६७४ वरून ७ लाख ३४ हजार ९५६ वर घसरली आणि नवीन रोजगाराच्या संधी देखील ४२ लाख ३६ हजार ४३६ वरून २४ लाख ९४ हजार ६९१ एवढी कमी झाली.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आर्थिक प्रगतीचा वेगही वाढला होता. ७१ लाख ०१ हजार ०६७ रुपयांच्या एकूण गुंतवणुकीसह ७ लाख ०४ हजार १७१ व्यवसायांनी ३० लाख २६ हजार ४०६ नवीन नोकऱ्या (२०१९-२०२०) निर्माण केल्या.
म्हणजेच पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ सत्तेवर असणाऱ्या फडणवीस सरकारपेक्षा महाविकास आघाडीच्या अवघ्या ३० महिन्यांच्या कार्यकाळात राज्यात ४ लाख ५१ हजार ८३१ जास्तीचे सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) राज्यात सुरु झाले. त्यातून २६ लाख ११ हजार ०२७ नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. माहिती अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार जेव्हा कोरोना महामारी शिगेला पोहोचली होती तेव्हा राज्यात ६ लाख २१ हजार २९६ नवीन उद्योगांची नोंदणी झाली होती ज्या माध्यमातून ४४ लाख ६० हजार १४९ रोजगार निर्मिती झाली.
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातील दोन वर्ष कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यात गेली. या काळातच मविआचे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यपाल यांच्या मदतीने सरकारला अडचणीत आणण्याचे, बदनाम करण्याचे प्रयत्न सातत्याने प्रयत्न केले. केंद्रातील मोदी सरकारनेही मविआ सरकारला मदत केली नाही. विरोधी पक्षाचे सरकार म्हणून अडवणूक केली. या सर्व संकटाचा सामना करत मविआ सरकारने चांगली कामगिरी केल्याचे स्पष्ट होत आहे. बोलघेवड्या शिंदे फडणवीसांनी मविआ सरकार कितीही टीका केली तरी महाविकास आघाडीचे सरकारने यांच्या अनैतिक व असंविधानिक सरकारपेक्षा उत्तम कामगिरी केली हे स्पष्ट दिसत आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.