गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोलीचे आमदार, ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते तसेच श्रमिक शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एफ.जी नाईक महाविद्यालयात युवतींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन श्रमिक शिक्षण मंडळाचे एफ.जी.नाईक महाविद्यालयातील आय.क्यू.सी. समिती तसेच करिअर गायडन्स अँड प्लेसमेंट सेल आणि महिला विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर २०२३ रोजी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरातील युवतींसाठी औद्योगिक मागणी आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी करण्यात आलेला भव्य रोजगार मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी नवी मुंबईचे प्रथम महापौर, ठाण्याचे माजी खासदार, श्रमिक शिक्षण मंडळाचे प्रमुख विश्वस्त डॉ. संजीव नाईक, श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व ऐरोली मतदार संघाचे प्रथम आमदार आणि भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, श्रमिक शिक्षण मंडळाचे विश्वस्त सदानंद म्हात्रे, नगरसेवक लीलाधर नाईक, समाजसेवक रॉबिन मढवी, नगरसेविका उषा भोईर, नगरसेवक पुरुषोत्तम भोईर, हरिओम ट्रस्टचे अध्यक्ष सुनील जैन, श्रमिक शिक्षण मंडळाचे कार्यकारी अधिकारी नरेंद्र म्हात्रे, एफ.जी.नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रताप महाडिक, रा.फ.नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
गरजू विद्यार्थिनींना शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे, तसेच काळाची गरज ओळखून विविध व्यावसायिक क्षेत्रांचे त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची पुढील वाटचाल ही यशस्वी करणे व याद्वारे विद्यार्थिनींना आर्थिक क्षेत्रात सक्षम व स्वालंबी बनवणे हा या रोजगार मेळाव्यामागील आयोजनाचा मुख्य हेतू होता.
यावेळी संदीप नाईक यांनी आपल्या मनोगतात सर्व विद्यार्थिनींना नवी मुंबईत उभ्या होत असलेल्या विविध कंपन्या, डेटा सेंटर, आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या अनुषंगाने उपलब्ध होणाऱ्या विविध रोजगारासाठी लागणाऱ्या विविध कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळविण्यास प्रेरित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगार केंद्रित विविध तांत्रिक व संभाषण कौशल्य मिळवावं असे आव्हान केले. तसेच आपल्या भाषणातून विद्यार्थिनींना आपल्या स्वबळावर आकाशात गवसणी घालण्यास प्रेरित केले व सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी नवी मुंबईचे शिल्पकार गणेश नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांनी आजवर नवी मुंबईच्या प्रगतीसाठी आणि या शहराला नावारूपाला आणण्यासाठी केलेल्या अथक परिश्रमांचा आढावा घेत सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानले.
श्रमिक शिक्षण मंडळाचे प्रमुख विश्वस्त डॉ.संजीव नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एफ.जी. नाईक महाविद्यालयात गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त असा समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक व समाधान व्यक्त केले. या भव्य रोजगार भरतीसाठी मुंबई, नवी मुंबई व ठाण्याहून आलेल्या युवतींना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या भाषणातून युवतींना रोजगारासाठी प्रयत्न करताना व करिअर घडवताना अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यास प्रेरित केले व यशाची पहिली पायरी हे अपयश असतं व ती पार करूनच यश संपादन करता येते ही यशास गवसणी घालणारी गुरुकिल्ली दिली. त्यांनी आपल्या भाषणातून विविध उदाहरणे देत विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांचा उल्लेख करत युवतींना ह्या यशस्वी स्त्रियांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्यास सांगितले. त्यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून नेहमीच असे समाज उपयोगी उपक्रम व रोजगार कुशल विद्यार्थी तयार व्हावेत अशी आशा व्यक्त केली.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये एकूण २० नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. यामध्ये बँकिंग व फायनान्स, सेल्स मार्केटिंग, ह्यूमन रिसोर्स, विज्ञान आयटी जसे की एचडीएफसी बँक एस.बी.आय बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आणि टाटानेक्स्ट रॅक अशा अनेक विविध नामवंत कंपन्यांचा समावेश होता. अशा विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्याद्वारे विद्यार्थिनींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच या रोजगार मेळाव्यामध्ये १००० विद्यार्थिनीं सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयश्री दहाट आणि आभार प्रदर्शन प्रा.स्मृतिगंधा बिडकर यांनी केले.