स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मुख्यमंत्री कार्यालयाने अनेकदा निर्देश देवूनही नवी मुंबई महापालिका प्रशासन व वाहतुक पोलीस वाहतुक कोंडीची समस्या हटविण्यासाठी काहीही कारवाई करत नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाला जुमानत नसल्याने ३१ ऑक्टोबर २०२३ या सव्वा महिन्याच्या कालावधीत ही समस्या कायमस्वरूपी न सुटल्यास एमआयएम विद्यार्थी आघाडी दररोज सांयकाळी रस्त्यावर बसून समस्येचे गांभीर्य राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देणार असल्याचा इशारा एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश सरचिटणिस व नवी मुंबई-रायगडचे प्रभारी हाजी शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका लेखी निवेदनातून दिला आहे.
या समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी एमआयएम विद्यार्थी आघाडीच्या वतीने शाहनवाझ खान यांनी मुख्यमंत्री कार्यालयास निवेदन सादर केले आहे. निवेदनात शाहनवाझ खान यांनी म्हटले आहे की, निवेदनातून आपणास गांभीर्याची तीव्रता समजणार नाही. आपण सांयकाळपासून ते रात्री उशिरापर्यत तसेच दुपारच्या वेळीही तिथे थांबून राहील्यास समस्येचे गांभीर्य आपल्या निदर्शनास येईल आणि अनुभवयासही मिळेल. या समस्या निवारणासाठी अनेक घटकांनी महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करूनही समस्या काही सुटत नाही, ही शोकांतिका आहे. वाहतुक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. जवळच सुश्रुषा रुग्णालय असल्याने रूग्णवाहिकांचा खोळंबा होत आहे. पालिका व वाहतुक पोलीस तेथील व्यावसायिकांचे हित जोपासत असल्याने रस्त्यावर खुलेआमपणे वाहने कशीही उभी केली जात आहेत आणि व्यावसायिकांनी पूर्णपणे मार्जिनल स्पेसवर व्यावसायिक कामासाठी अतिक्रमण केले आहे. वाहतुक पोलीस व महापालिका प्रशासन येथील व्यावसायिकांवर प्रेम दाखवित असल्याने या वाहतुक कोंडीच्या भस्मासूराला खतपाणी मिळत आहेत आणि त्या ठिकाणी असणारे महापालिकेने लावलेले महापालिकेचे नो पार्किगचे फलक नामधारी बनले आहेत. रस्त्याच्या समोरच असणारे वाहतुक पोलीसही या वाहतुक कोंडीकडे बघ्याची भूमिका घेत आहे ही शोकांतिका असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनात म्हटले आहे.
नेरूळ सेक्टर सहा व चारच्या मध्ये चौक आहे. या चौकात वाहनांची वर्दळ नेहमीच असते. सेक्टर सहामधील व सेक्टर चारमधील वाहने पामबीच मार्गाकडे जाण्यासाठी अथवा राजीव गांधी उड्डाण पुलाकडे जाण्यासाठी याच चौकात येतात. या चौकापासून हाकेच्याच अंतरावर असलेल्या पामबीच मार्गाकडून नेरूळमध्ये येणारी वाहने सेक्टर २,४,६, १६, १८, २०, २४ सेक्टरकडे जाण्यासाठी या चौकातूनच ये-जा करतात. या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यापासून वाहतुक कोंडीची समस्या होती. परंतु आता या समस्येचा भस्मासूर झालेला आहे. या चौकातून वाहने बाहेर काढण्यासाठी २० ते ३५ मिनिटे लागतात. यादरम्यान कोणी रूग्णवाहिकेत सिरीयस असलेला रूग्ण उपचाराअभावी दगावण्याची भीती आहे. कोठे दुर्घटना घडल्यास अग्निशमनच्या वाहनांना घटनास्थळी लवकर जाता येत नसल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या चौकालगतच मोठमोठी हॉटेल, टायर विक्रीची दुकाने आहेत. हॉटेलचालकांनी, टायर दुकानवाल्यांनी मार्जिनल स्पेसवर पूर्णपणे अतिक्रमण केल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्यांची वाहने रस्त्यावर कोठेही उभी असतात. नो पार्किंगचे फलक नामधारी झाले असून फलकासमोरच वाहने उभी असतात. या हॉटेलांच्या विरूध्द दिशेलाच वाहतुक पोलीस असतानाही या वाहनांवर कारवाई केली जात नाही. टायरविक्रेत्यांने मार्जिनल स्पेसमध्ये टायर बदलण्यासाठी आलेली वाहने उभी केल्यास तेथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यातून पादचारी व वाहनचालकांची दररोज भांडणे होवून गर्दी जमा होवून वाहतुक कोंडी वाढते. या ठिकाणच्या वाहतुक कोंडीवर महापालिका व वाहतुक पोलिसांनी सातत्याने कारवाई करून तोडगा काढणे आवश्यक आहे. या चौकालगत हॉर्टचे हॉस्पिटल आहे. वाहनांची गर्दी झाल्यावर हॉर्नच्या सतत आवाजामुळे रूग्णही त्रस्त झाले आहेत. येथील मार्जिनल स्पेसवर विळखा घालणारे टायरविक्रेते, हॉटेलचालक यांच्यावर दररोज महापालिकेने कारवाई केल्यास पादचाऱ्यांना ये-जा करण्यास कोणताही अडथळा येणार नाही. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर टोईग लावून वाहतूक पोलिसांनी सतत कारवाई केल्यास दंडामुळे येथे कोणी वाहने उभी करणार नाही. वाहतुक कोंडीची समस्या निकाली निघेल. या चौकातील वाहतुक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका प्रशासन व वाहतुक पोलिसांनी संयुक्तपणे सातत्याने कारवाई करावी. समस्येमुळे वाहनचालक व पादचारी तसेच सभोवतालच्या इमारतीमधील रहीवाशी त्रस्त झाले आहेत. हॉर्नचा आवाज व धुराचा त्रास स्थानिकांना नाहक सहन करावा लागत आहे. आपण या समस्येचे कायमस्वरूपी निवारण करण्यासाठी संबंधितांना आदेश देवून वाहनचालकांना, पादचाऱ्यांना आणि स्थानिक रहीवाशांना दिलासा द्यावा, ही आपणास नम्र विनंती. याबाबत आपणाकडून नवी मुंबई महापालिका प्रशासन व वाहतुक पोलीस यांना समस्या सोडविण्यासाठी अनेकदा निर्देश देवूनही या निर्देशाला वाहतुक पोलीस व महापालिका प्रशासन जुमानत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही राज्य सरकारला ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यतची मुदत देत आहोत. या सव्वा महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारने वाहतुक पोलीस व महापालिकेच्या माध्यमातून या समस्येचे कायमस्वरूपी निवारण न झाल्यास एमआयएम विद्यार्थी आघाडी त्या ठिकाणी दररोज सांयकाळी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा हाजी शाहनवाझ खान यांनी निवेदनातून दिला आहे.