जय मैती: Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई -: कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपाचे विधान परिषदेतील आमदार रमेश पाटील यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नवी मुंबईतील मच्छी विक्रेत्या महिलांना अधिकृत मासे विक्री परवाने, मच्छी विक्रेत्या महिलांना शीतपेट्या तसेच आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे शेतकरी शिक्षण संस्था घणसोली आणि तळवली गाव येथे वृक्षारोपण करून शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
आमदार रमेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, विधानभवनातील सहकारी आमदार, राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले आदिवासी कोळी व मच्छीमार बांधव, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.
तसेच गेल्या २५ ते ३० वर्षापासून नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्र मच्छी विक्रेत्या महिलांचा मासे विक्री परवान्याचा प्रलंबित प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवून आज प्रत्यक्ष अधिकृत मासे विक्री परवाने, शीतपेट्या, आयुष्यमान भारत कार्ड वाटप करताना आनंद होत असल्याचे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी कोळी व मच्छीमार बांधवांच्यावतीने शालेय साहित्याचे वाटप, फळे वाटप व आरोग्य शिबिरे असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी कोळी व मच्छीमार बांधव आमदार पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त बोलताना आमदार पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि समाज बांधवांचे आभार मानले.