स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : मतदार यादी हा निवडणूक प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून निर्दोष मतदार यादी ही निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्याची पहिली आणि महत्वाची पायरी असल्याचे सांगत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निवडणूक कामकाजाचे महत्त्व लक्षात घेऊन मतदार यादीत नवीन सेक्शन अॅड्रेस टाकणे व सेक्शन अॅड्रेस अद्ययावत करण्याचे काम काळजीपूर्वक करावे असे सूचित केले.
मा.भारत निवडणूक आयोग व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांचे निर्देशानुसार मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम २०२४ घोषित करण्यात आला असून त्याबाबत माहिती देण्याकरिता व त्याबाबतच्या कार्यवाहीला गती देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी निवडणूक विषयक कामकाज करणारे नवी मुंबई महानगरपालिकेतील संबंधित अधिकारी यांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जयकुमार म्हसाळ, बेलापूर विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी संभाजी अडकुने, ऐरोली विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी अंजली पवार, नवी मुंबई महानगरपालिकेचे निवडणूक उपायुक्त श्री शरद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मतदान केंद्रस्तरिय अधिकारी (बीएलओ) यांची मतदार यादीच्या कामात महत्वाची भूमिका असून शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचणारा हा निवडणूक आयोगाचा दुवा असल्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. त्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वयाची भूमिका ठेवत जास्तीत जास्त बीएलओ उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएलओचे काम काहीसे आव्हानात्मक असून कामाच्या स्वरूपानुसार नागरिकांचे वेगवेगळे असणारे सुट्टीचे दिवस लक्षात घेऊन बीएलओला त्यांची भेट घेऊन काम करावे लागते असे सांगत कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्यापूर्वी पूर्णपणे खात्री करूनच नाव वगळण्याची प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक करावी अशा सूचना आयुक्तांनी केल्या.
१४ जुलै २०२३ रोजीच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार याबाबत स्पष्ट सूचना प्राप्त झाल्या असून त्यामध्ये सेक्शनबाबत करावयाची कार्यवाही नमूद केलेली आहे. त्यानुसार काटेकोरपणे मतदार यादी तपासणीवर भर द्यावा असे आयुक्त म्हणाले.
मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू झाला असून त्याकरिता मतदारांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करताना आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनी याबाबतची माहिती व्यापक स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहिरात फलक, बॅनर्स, स्टॅंडी, भित्तीसंदेश, सोशल मिडिया, गणेशोत्सव – नवरात्रोत्सवांमध्ये प्रसिद्धी अशा विविध माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती दिली. प्रास्ताविकपर मनोगतात बेलापूर विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी संभाजी अडकुने यांनी अशाप्रकारे मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाकरिता विशेष बैठक घेणारी नवी मुंबई ही पहिलीच महानगरपालिका असल्याचे सांगितले.
मतदार यादीतील मतदाराचा ज्या भागात रहिवास आहे त्याच सेक्शनमध्ये त्याचे नाव असावे ही भूमिका नजरेसमोर ठेवून हा पुनरिक्षण कार्यक्रम राबविला जात असल्याचे सांगत संभाजी अडकुने यांनी आयोगाच्या सूचनांनुसार कार्यवाही करावी व हे करताना मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिल्या. मतदार यादी पुनरिक्षण करण्याप्रमाणेच मतदान केंद्रांच्या जागेचीही १०० टक्के पडताळणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सर्वांच्या समन्वयातून निर्दोषपणे पार पडेल असा विश्वास महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केला.