स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सर्वसाधारणपणे श्रीगणेशोत्सवातील आरतीचा मान मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर लोकप्रतिनिधी अथवा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते करण्याची गणेशोत्सव मंडळाची परंपरा असते. पण या परंपरेला छेद देत घणसोली येथील शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवातील श्रींच्या आरतीचा बहुमान नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छताकर्मींना देऊन आपले सामाजिक बांधिलकीतील वेगळेपण दाखवून दिले आहे.
स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असून नवी मुंबई महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवर स्वतःचे मानांकन कायम उंचावत ठेवले आहे. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छताकर्मी सेवाभावी वृत्तीने दररोज करीत असलेल्या कामाचा सर्वात महत्त्वाचा वाटा असून दिवसरात्र तिन्ही ऋतूंमध्ये हे स्वच्छताकर्मी शहर स्वच्छतेची आपली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पित भावनेने केलेल्या कामामुळेच नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेमध्ये नेहमीच आघाडीवर राहिली आहे. त्यामुळे या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव करीत व त्यांच्या कामाबद्दल एक प्रकारची कृतज्ञता प्रदर्शित करीत घणसोली येथील शिवसाई गणेशोत्सव मंडळांने त्यांना आरतीचा बहुमान देऊन त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव तर केलाच शिवाय श्रमप्रतिष्ठेचे मूल्य अधिक उंचावले आहे. या कृतीबद्दल शिवसाई गणेशोत्सव मंडळ घणसोली यांची सर्व स्तरातून प्रशंसा करण्यात येत आहे.