स्वयंम न्युज ब्युरो : ९८२००९६५७३ – ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांच्या वतीने स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा भव्य मेळावा सोमवार, दि. २५ सप्टेंबर रोजी तुर्भे येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती युनियनचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी माथाडी भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार, कामगार मंत्री सुरेश खाडे, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, माजी आमदार संदीप नाईक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.
तुर्भे येथील मुंबईकृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटच्या लिलावगृहामध्ये सकाळी ९ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात पाक्षिक ‘माथाडी मित्र’चे पुन: प्रकाशन, माथाडी युनियनच्या ‘संकेतस्थळाचे’ (वेबसाईटचे) उद्घाटन, ‘माथाडी भूषण’ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
माथाडी कामगारांच्या नावाखाली काही माथाडी कामगार संघटना व्यापाऱ्यांकडून खंडणी वसूल करत आहेत. याविषयी पोलीस यंत्रणेकडून कोणतीही कारवाई होत नाही, तसेच ज्या माथाडी कामगार संघटना रिटर्न फाईल करत नाही त्याविषयी माथाडी मंडळाकडून कारवाई केली जात नाही,असा आरोप नरेंद्र पाटील यांनी या वेळी केला.
या वेळी अधिक माहिती देताना नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, माथाडी कामगारांच्या विविध मागण्या राज्य शासनाकडे प्रलंबित. यामध्ये बाजार समितीमधील मार्केट आवारा लगत असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये सिडकोच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये माथाडी कामगारांना घर घेण्यासाठी केवळ ५ टक्के आरक्षण आहे ते वाढवून देण्यात यावे, माथाडी कामगार कायदा उध्वस्त करणारे विधेयक रद्द करण्यात यावे, माथाडी कामगार कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत, दूर करण्यात याव्यात, माथाडी कामगार मंडळात माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी यांसह अन्य मागण्यांचा समावेश आहे.
कामगार मंत्री सुरेश खाडे हे स्वतः उद्योजक आहेत. त्यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याचा विचार केला पाहिजे; परंतु ते उद्योजकांचा हिताचा विचार करत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप पाटील यांनी या वेळी केला. तसेच
या माथाडी कामगार मेळाव्यामध्ये स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या माथाडी कामगारांची आम्ही ताकद दाखवून, कामगार विभागाने माथाडी कामगारांच्या विरोधात जो कायदा करण्याचा घाट घातला आहे, तो हाणून पाडू, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.