स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२६४६- ९८२००९६५७३
नवी मुंबई : सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानात तातडीने स्वच्छता अभियान (गवत कापणे, मूषक नियत्रंण, ब्लिचिंग पावडर फवारणी, धुरीकरण) राबवून सानपाडावासियांना दिलासा देण्याची लेखी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नवी मुंवई जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.
सानपाडा, सेक्टर ९ मध्ये मिलेनिअम सोसायटी व नवभारत प्रेसच्या समोर महापालिकेचे सिताराम मास्तर उद्यान आहे. या उद्यानात सानपाडा कॉलनीतील रहिवाशी या उद्यानात चालण्यासाठी व फिरण्यासाठी येत असतात. सानपाडा, नेरूळ, जुईनगर, तुर्भे परिसरातील हे मोठे व विस्तिर्ण उद्यान व क्रिडांगण आहे. मैदानावर पावसामुळे जंगली गवत वाढल्याने मुलांना मैदानावर खेळण्यासाठी येणे शक्य नाही. त्यामुळे मुले घरात मोबाईलवर गेम, टीव्ही नाहीतर संगणकावर कार्यरत असतात. आपण जर तातडीने हे गवत काढले तर मुलांना क्रिकेट, फुटबॉल खेळणे शक्य होईल. नेरूळ सेक्टर ४ मधील क्रिडांगणाची पालिका प्रशासनाने रविवारी सफाई केली आहे. नेरूळची क्रिडांगणावरील जंगली गवत पालिका प्रशासन काडू शकते, तर सानपाडा सेक्टर ७ मधील सिताराम मास्तर उद्यानातील जंगली गवत का काढले जात नाही? सानपाडावासी कराचा भरणा करत नाही काय? अडीच महिने पडत असलेल्या पावसामुळे या उद्यान व क्रिडांगणात जंगली गवत मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या रहीवाशांना डासांचा व चिलटांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
सानपाडावासियांच्या मागणीस्तव संबंधितांना या उद्यानात लवकरात लवकर स्वच्छता अभियाना राबविण्यास सांगावे. सर्वप्रथम या उद्यानात वाढलेले जंगली गवत हटविण्यास सांगावे. डासांचा त्रास वाढीस लागल्याने धुरीकरण व डासअळीनाशक फवारणी या उद्यानात आवश्यक आहे. डासांमुळे सानपाडावासियांना उद्यानात फिरणे अवघड झाले आहे. उंदरांनी उद्यानामध्ये ठिकठिकाणी बिळे केली आहेत. उद्यानात सकाळ, दुपार-सध्याकाळ खुलेआमपणे उंदीर दिसतात. या उंदरामुळे उद्यानात अधूनमधून साप-नागही दिसतात. उंदराना खाण्यासाठी ते येत असावेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्यांना सर्पदंशाची भीती आहे. याशिवाय पावसामुळे उद्यानातील पायवाटा निसरड्या झाल्या आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिक घसरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उद्यानातील पायवाटांवर ब्लिचिग पावडरची फवारणी केल्यास कोणी पडणार नाही व दुखापतही होणार नसल्याचे पांडुरंग आमले यांनी निवेदनात म्हटले आहे.
आपण उद्यानात येणाऱ्या सानपाडावासियांना होत असलेल्या त्रासाचे गांभीर्य लक्षात घेवून पालिका प्रशासनातील संबंधितांना या उद्यानात स्वच्छता अभियान रावबिण्याचे निर्देश देताना गवत कापणे, मूषक नियत्रंण, ब्लिचिंग पावडर फवारणी, धुरीकरण आदी समस्यांचे नियत्रंण करण्यास सांगण्याची मागणी पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.