नवी मुंबई : कॉंग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली पक्षसंघटना वाढीसाठी संघटनात्मक बदल करताना कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहाचा समावेश असलेल्या प्रभाग क्रं ८५च्या अध्यक्षपदी सतीश प्रभाकर पगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग ८५चे पूर्वीचे वॉर्ड अध्यक्ष किशोर तांबे यांना ब्लॉक कमिटीवर पदाधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
कॉंग्रेसच्या नेरूळ नोडमधील सेक्टर दोन येथील मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या हस्ते सतीश पगारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, गणेश इंगवले, किशोर तांबे, परेश कान्हाळकर, शुभम पवार व कॉंग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात बोलताना कॉंग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी नेरूळ नोडमध्ये कॉंग्रेस पक्ष वाढविताना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल. नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांनी आपल्या भाषणात सतीश पगारे यांना शुभेच्छा दिल्या.