स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२६४६- ९८२००९६५७३
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर कोळीवाडा विसर्जन पथकाने घातला दंडवत
पनवेल: महिनाभर आधीपासून भव्य शामियाना उभारणीची लगबग सुरु झाल्यापासून भक्तांच्या अपेक्षाना नवनिर्मितीच्या पारंब्या फुटल्या होत्या. स्वागत सोहळ्याला उसळलेल्या गर्दीच्या उच्चांकाचा आलेख दहा दिवस वाढता वाढता वाढे अशा तऱ्हेने हनुमान गतीने वाढत राहिला आणि निरोप घेताना चंद्राच्या शीतल छायेत गर्दीचा शिखर उजाळून निघाला होता. पहाटे कोळीवाडा समुद्रात कोळेश्वर पंच कमिटी आणि विसर्जन समितीच्या शंभर जणांच्या पथकाने मोठ्या आर्त भावाने 4 वाजून 51 मिनिटांनी ब्राह्ममुहूर्तावर निरोप दिला.
कांतीलाल प्रतिष्ठान रायगडचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी सामाजिक संकेत देत कलियुगातील राक्षसी वृत्तीचा बिमोड करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करून सात्विकवृत्तीचे राज्य प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांतून नृसिंह अवतारातील पनवेलचा महागणपतीच्या मूर्तीची संकल्पना मांडली होती. मुंबईतील ख्यातनाम मूर्तीकार निखिल राजन खातू यांच्या हातून साकारलेल्या बाप्पाने पनवेल जिंकले. मांडीवर हिरण्यकश्यपूचा वध करताना भक्त प्रल्हादाची भक्ती सैतानीवृत्तीमध्येही कशी जिंकते आणि शेवटी सत्याच्या विजयाच्या पताका घेऊन दिलेल्या वाचनाप्रमाणे देव भक्तांच्या हाकेला धावून येतो, अशी मूर्ती घडवण्यात आली होती.
दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे शिष्य असलेले कला दिग्दर्शक प्रथमेश दळवी यांनी मोठ्या मेहनतीने आणि जिद्दीने पुरातन मंदिर उभारले होते. विशेष म्हणजे मंदिराचा प्रवेशद्वार कोणत्याही नियोजनाशिवाय आपोआप पिठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी साम्य सांगणारा घडून आला आणि खऱ्या अर्थाने श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज जन्मोत्सव साजरा करणारा पनवेलचा महागणपती सुवर्ण पिठापुरात नांदला.
दहा दिवसात पूजा, अर्चा, हवन, श्री गणेश याग, नवग्रह पूजा, कुलदैवत, कुलस्वामिनी पूजा, पुरुष सूक्त, श्री सूक्त आणि अथर्वशीर्ष पठण असा भक्तीचा सोपान घालण्यात आला होता. सार्वजनिक गणेशोत्सवात असे भक्तिमय वातावरण आभावानेच बघायला मिळते, त्यामुळे भक्तांच्या अपेक्षानापेक्षा शंभर पावले पुढे असणारा हा महागणपतीचा उत्सव सोहळा अविस्मरणीय ठरला. दहा दिवस भजन, गोंधळ, जागरण, सांगितिक सुंदरकांड पठण, भक्ती व भावगीते, गुजराती अस्मितेचा डायरो अशा विविधांगी कार्यक्रमातून पनवेल, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, तळोजे आदी शहारात आणि संपूर्ण ग्रामीण भागातील घरोघरी पनवेलचा महागणपतीच्या थाटाची चर्चा सुरु आहे.
काल दुपारी ४ वाजून ३५ मिनिटांनी गुजराथी शाळा मैदानातील शामियानातून बाप्पाची स्वारी निरोप घेण्यासाठी अलिबाग कुरुळ कोळीवाडा येथील अष्टविनायक बँजो पथकाच्या अप्रतिम वादनाने वाजत गाजत निघाली. शिवाजी महाराज चौकातून डाव्या बाजूने वळसा घेत मिडल क्लास सोसायटी जिंकत कोहिनुर नाका, लोटस सिटी स्कॅन सेंटर येथील पूर्वाश्रमीच्या शामियानाच्या जागेत आगमन होताच अवघी मिडलक्लास सोसायटी देवबाप्पाचे औक्षण करण्यासाठी आतुरतेने प्रतीक्षेत होती, त्यांचे स्वागत स्वीकारून बाप्पा पुन्हा रुपाली सिनेमा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदर्श हॉटेल, जुन्या तहसीलदार कार्यालयाच्या रेंगाळलेल्या इमारतीकडे कृपा कटाक्ष टाकत बाप्पा रयतेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील स्मारका पासून कोळीवाडाकडे निघाला होता. पावसाने मनाचा मोठेपणा दाखवून घेतलेली विश्रांती गणेशभक्तांना ऊर्जा ठरली. त्यामुळे बाप्पाच्या निरोपासाठी रस्ते आणि चौक भक्तांनी दरवळत फुलून राहिले होते.
पहाटे ब्राह्ममुहूर्तावर ३ वाजून ३५ मिनिटांनी पनवेल महापालिकेच्या हायड्रा यंत्रणेच्या साहाय्याने पनवेलचा महागणपतीची छान, बोलकी, देखणी आणि साक्षात भगवंत संचारलेली मूर्ती खाडी पुलावरील ट्रॉलीवरून उचलून समुद्रात उभ्या केलेल्या तराफ्यावर अलगद ठेवण्यात आली. त्यानंतर बाप्पा शांत असलेल्या समुद्राशी हितगुज करत कोळीवाडा येथील कोळेश्वर पंच कमिटी आणि विसर्जन मंडळासोबत गप्पांची मैफिल रंगवत निघाले. या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की, खोल समुद्रात स्वारी गेली तेव्हा घड्याळाचे काटे पुढे सरकून ४ वाजून ५१ मिनिटावर स्थिरावले आणि क्षणार्धात बाप्पा मूळ निवासस्थान असलेल्या क्षीरसागरात पहुडले… तेव्हा पृथ्वीतळावर अनामिक शांतता आणि सुमधुर लहरी वाहत होत्या…!