स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : उद्यानामध्ये महापालिका प्रशासनाकडून सातत्याने कचऱ्याचे ढिगारे साठविले जात असल्याने नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या सिव्ह्यू उद्यानाला डम्पिंग ग्राऊंड जाहीर करण्याची लेखी मागणी संदीप खांडगेपाटील यांनी एका निवेदनातून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर सहा परिसरात सुश्रुषा रुग्णालयासमोर व नेरूळ सिव्ह्यू सोसायटीलगतच महापालिकेचे सिव्ह्यू नेरूळ हे उद्यान आहे. या उद्यानाचा वापर स्थानिक रहीवाशांसाठी न होता महापालिका प्रशासनाकडून कचरा साठवण्यासाठी डम्पिग ग्राऊंड म्हणून केला जात आहे. यामुळे परिसराला बकालपणा आला असून स्थानिक रहीवाशांना दुर्गंधीचा व डासांचा सामना करावा लागत आहे. उद्यानात प्रवेश करतानाच आपणास प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढिगारे पहावयास मिळतात. यापूर्वीही असेच चित्र असल्याने आपणास सातत्याने लेखी तक्रारी केल्यावर उद्यान स्वच्छ करण्यात आले होते. परंतु आता पुन्हा या उद्यानात कचरा साठवण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. सुश्रुषा रुग्णालयात नवी मुंबई, पनवेल-रायगड परिसरातून रुग्ण येतात. रुग्णांच्या नातेवाईकांना उद्यानात हे चित्र पहावयास मिळते. यातून त्यांच्या मनात या शहराची व महापालिका प्रशासनाची प्रतिमा नक्कीच मलीन होत असणार. उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढिगारे आजही आहेत. स्थानिक रहीवाशांना यामुळे डासाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. आपण या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट मारल्यास आपणास समस्येचे गांभीर्य निदर्शनास येईल. आपण लवकरात लवकर उद्यानातील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याचे व या ठिकाणी पुन्हा कचरा साठवणूक न करण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे.